मुंबई - गोवा महामार्गावर टोलधाड ! 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 21 August 2019

  • मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणानंतर दहा ठिकाणी टोलनाके बसवण्याचे निश्‍चित
  • पनवेल ते झाराप दरम्यान टोलनाके
  • प्रत्येक 40 कि. मी. अंतरावर एक टोलनाका
  • पुढील पंधरा वर्षांसाठी वाहनधारकांना प्रवास करताना भरावा लागणार टोल
  • राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अभियंता एस. जी. शेख यांची माहिती. 

रत्नागिरी - मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणानंतर दहा ठिकाणी टोलनाके बसवण्याचे निश्‍चित झाले आहे. पनवेल ते झाराप या दरम्यान हे टोलनाके असणार आहेत. प्रत्येक 40 कि. मी. अंतरावर एक टोलनाका आहे. पुढील पंधरा वर्षांसाठी वाहनधारकांना प्रवास करताना टोल भरावा लागणार आहे, अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अभियंता एस. जी. शेख यांनी दिली. 

चौपदरीकरण पूर्ण झाल्यानंतर प्रवास सुखकर आणि कमी कालावधीचा होणार आहे. मात्र या महामार्गाने प्रवास करणाऱ्या वाहनधारकांच्या खिशाला चाट बसणार आहे. या महामार्गावरील प्रवास टोलमुक्त असावा, अशी मागणी आहे. परंतु, या मागणीला फाटा देत मुंबई-गोवा महामार्गावर तब्बल दहा ठिकाणी टोलनाके उभारण्यात येणार आहेत. पाच दहा नव्हे, तर कंपन्या खर्च वसूल करेपर्यंत म्हणजे 15 वर्षे हा टोल वसूल करणार आहेत. पनवेल ते झाराप या दरम्यान प्रत्येक 40 किमीवर एक टोलनाका याप्रमाणे हे 10 टोलनाके असणार आहेत. महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांसाठी टोलनाक्‍यांच्या ठिकाणी शौचालये आणि इतर सोयीसुविधा देण्यात येणार आहेत. 

मुंबई - गोवा महामार्गावरील वाढत्या अपघातांमुळे चौपदरीकरणाच्या मागणीने जोर धरला. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी वेग दिला. चौपदरीकरणासाठी 1700 कोटी निधी घोषित करून 2019 पर्यंत चौपदरीकरण करण्याची घोषणा केली. मात्र, या कामात अनेक अडचणी आल्या. त्या अजूनही कायम आहेत. सुरवातीला चौपदरीकरणावरील पुलांचा ठेका घेतलेल्या कंपनीने घोळ घातला. उपठेकेदाराचे पैसे न दिल्याने पुलांची कामे रखडली व नव्याने निविदा काढण्याची वेळ आली. अपूर्ण पुलांच्या पूर्णत्वासाठी रस्त्याचा ठेका घेतलेल्या ठेकेदार कंपन्यांवर जबाबदारी टाकली. रत्नागिरी, संगमेश्वर आणि लांजा तालुक्‍यात ठेका घेतलेल्या कंपनीने कामात दिरंगाई केली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कामच प्रगतिपथावर आहे.

कॉंक्रिटीकरणाचे 70 टक्के काम पूर्ण झाले आहे. केवळ संगमेश्वर आणि रत्नागिरीतील कामे कासवाच्या गतीने सुरू आहेत. 

संगमेश्‍वर, रत्नागिरी वगळता चौपदरीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. सिंधुदुर्गात तर 70 टक्के काम झाले. रस्त्याचे काम झाल्यावर पनवेल ते गोव्यापर्यंत दहा टोलनाके उभारले जाणार आहेत. प्रत्येक 40 किमी अंतरावर टोल असून 15 वर्षे ते वसूल करणार आहेत. 

- एस. जी. शेख, 
राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अभियंता 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ten Toll Nakas on Mumbai Goa highway