
आमच्या दशक्रोशीत एकेक नग होऊन गेलेत. पु. ल. म्हणाले तसे डोक्यावर बालपणापासून जिरलेल्या खोबरेल तेलामुळे यांचेपाशी तैलबुद्धी प्राप्त होऊन मेंदू तरल झालेला! दारिद्र्यामुळे विनोदाशी सख्य जडलेले, लोकांची मापे काढताना स्वतःवरही विनोद करण्याची उपजत प्रवृत्ती, यांत आपपरभाव बिल्कुल नाही. सकाळी उठल्यावर न्याहरीला मऊ गुरगुट्या भात, त्यावर मेतकूट अन् लोणकढ तूप नी चवीला लोणच्याची फोड! हे दुपारसाठी जठराग्नी प्रदीप्त करण्याचे काम करत असे. मग दुपारी आमटीभात! अन् रात्री मात्र कणीची किंवा दाण्याची (नाचणी) भाकरी, लोणी अन् कडधान्याची उसळ किंवा रानभाजी! नो पंजाबी, नो वडापाव, नो मिसळ त्यामुळे आरोग्य उत्तम!
- अप्पा पाध्ये, गोळवली