रत्नागिरी : तालुक्यातील जाकिमिऱ्या गावातील पाटीलवाडी येथे शनिवारी (ता. २०) सकाळी समुद्र किनाऱ्यावर व्हेल मासा मृतावस्थेत आढळून आला. २५ फुटाहून अधिक लांबीचा हा महाकाय व्हेल होता. कुजलेल्या अवस्थेत किनाऱ्यावर लागलेल्या व्हेलचा मृत्यू काही दिवसांपूर्वी झाला असावा, असा अंदाज वर्तविला जात आहे.
गेल्या पाच वर्षात रत्नागिरी जिल्ह्यातील किनारी भागात मृतावस्थेतील व्हेल सापडल्याच्या नोंदी झाल्या आहेत. त्यात जाकिमिऱ्या येथील सापडलेल्या व्हेलीची भर पडली आहे. पौर्णिमेच्या उधाणाबरोबर हा महाकाय व्हेल मध्यरात्रीच्या सुमारास किनारी भागाला लागला. सुरवातीला तो पाण्यात दिसून आला. लाटांबरोबर तो वाळूत आला. ही माहिती मिळाल्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्या माशांची लांबी २५ फुट असून त्याचा मृत्यू समुद्रातच झाला होता. मृतावस्थेत तो वाहत किनाऱ्यावर लागला. काही दिवसांपूर्वी त्याचा मृत्यू झाला असल्यामुळे तो सडलेल्या अवस्थेत होता. त्याची वैद्यकीय तपासणीही करणे अशक्य होते. त्यामुळे माशाची नियमानुसार विल्हेवाट लावण्याचा निर्णय वनविभागाने घेतला. वाळूतच मोठा खड्डा खोदून त्याला पुरण्यात आले.
व्हेल हा सागरी सस्तन प्राणी असून सर्वात मोठा मासा म्हणून ओळखला जातो. व्हेल माशाच्या उलटीला कोटी रुपयांच्या घरात किंमत मिळते. त्या उलटीची तस्करी केली जाते. गेल्या काही महिन्यांत कोकणात तीन ठिकाणी उलटीची तस्करी केल्याचे प्रकार उघड झाले.
जाकिमिऱ्या पाटीलवाडी येथील समुद्र किनारी मृतावस्थेतील व्हेल दिसून आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. त्यानंतर घटनास्थळाची पाहणी केली असून तो मासा पूर्णतः सडलेल्या अवस्थेत आढळला. प्रचंड वास येत असल्यामुळे किनाऱ्यावरील वाळूतच त्याला पुरण्यात आले.
- प्रियंका लगड, वनाधिकारी
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.