esakal | आधीच्या घोषणावर प्रश्‍न नकोत, म्हणून लॉकडाउन?

बोलून बातमी शोधा

Lockdown
आधीच्या घोषणावर प्रश्‍न नकोत, म्हणून लॉकडाउन?
sakal_logo
By
मुझफ्फर खान

चिपळूण (रत्नागिरी) : लोक बाहेर निघाले नाही तर संसर्ग वाढणार नाही, हे सत्य आहे. पण लोकांना घरात कोंडून ठेवणे, हा कोरोनावर मात करण्याचा अंतिम उपाय नाही, हे जगभरात सिद्ध झाले असताना सुद्धा त्याचे समर्थन केले जात आहे. नेत्यांना आधीच्या घोषणांविषयी कुणी प्रश्‍न विचारू नये, म्हणून लॉकडाउनचा आधार घेतला जात असल्याची चर्चा सामान्य लोकांमध्ये आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत रुग्णांवर उपचार कोणते करावेत, या विषयी वैद्यक क्षेत्र चाचपडत होते. अनुभवानंतर त्याची दिशा निश्‍चित झाली. अशावेळी प्रत्येकाला उपचार मिळावेत, अशी व्यवस्था निर्माण करण्याचे काम सरकारी यंत्रणेचे. सुदैवाने जिल्ह्यातील पाचही आमदार महाविकास आघाडी सरकारमधील आहेत. कोरोनाचे संकट हे भविष्यात असणारच आहे. त्यावर मात करताना कमीत कमी नुकसान कसे होईल, अशी व्यवस्था निर्माण करण्यासाठी पुरेसा म्हणजे एक वर्षाचा कालावधी मिळाला तरी एकाही आमदाराकडून तसे प्रयत्न झाले नाही. लॉकडाउन हा एकच पर्याय डोळ्यासमोर ठेवून जिल्ह्याची वाटचाल सुरू आहे. यामध्ये सामान्य लोकांचे मरण होत आहे. त्याकडे कोणीच लक्ष देत नाही.

हेही वाचा: सांगलीत मॉर्निंगवॉकसाठी आलेल्या 60 नागरिकांची रॅपिड अंटीजन चाचणी

लोक ऐकत नाहीत, गर्दी करतात, विनाकारण फिरतात, अशी दूषणे आज नेते देत आहेत. यात तथ्य आहेच, पण गेले वर्षभर नेत्यांनी काय केले? किती नवीन रुग्णालये उभारली? औषधांच्या साठ्याची काय व्यवस्था केली? याची उत्तरे यापैकी कुणीच द्यायला तयार नाहीत. ज्यांचे हातावर पोट आहे, तो बाहेर पडणारच. सरकारी मदत त्याच्यासाठी पुरेशी नाही. ज्यांना रोजगाराशिवाय पर्याय नाही, अशांचा विचार कुणी करायचा? बंदी हा कोणत्याही समस्येवरचा अंतिम उपाय नाही, हे सत्य कायम दिखावूगिरी करणाऱ्या नेत्यांना व व्यवस्थेला ठाऊक आहे. तरीही स्वत:चे नाकर्तेपणा लपवण्यासाठी वारंवार त्याचाच वापर केला जातोय व त्याचे समर्थनही केले जात आहे.

कोरोनावर मात करण्यासाठी जिल्हा नियोजन मंडळ आणि जिल्ह्यातील आमदारांचा निधी मिळणार आहे. या निधीतून पुढील सहा महिने कोरोनावर मात करणे शक्‍य होणार आहे. ग्रामीण भागातील आरोग्ययंत्रणा सक्षम करण्यावर आमचा भर सुरू आहे. आतापर्यंत लोक चाचण्यांसाठी शहरात येत होते. यापुढे आमची यंत्रणा गावात जावून चाचण्या घेणार आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी उपायोजना सुरू आहेत.

- उदय बने, आरोग्य सभापती रत्नागिरी जिल्हा परिषद

प्रशासनाकडून लॉकडाउन करण्यात आले. आमचा त्याला विरोध नाही. पण वर्षभरात कोरोनावर मात करण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या गेल्या. जी आश्‍वासने दिली गेली, त्याची पूर्तता झाली का? हे लोकांनी विचारू नये, म्हणून लॉकडाउन लादले जात आहे. त्यात व्यापाऱ्यांसह सामान्य लोकांचे हाल झाले आहेत.

- आशिष खातू, शहरप्रमुख चिपळूण भाजप