
प्लास्टिक हा आता जणूकाही मानवाच्या जीवनाचा अविभाज्यच घटक झाला आहे. पण या अविभाज्य घटकाला आता आपल्या जीवनातून ज्या पद्धतीने कमी करता येईल त्या पद्धतीने कमी करणे आवश्यक गोष्ट आहे. त्याकरिता तीन आर जे आहेत त्याचा अंगिकार प्रत्येकाने करणे अत्यावश्यक आहे. पहिला आर रिड्यूस, दुसरा आर रियुज आणि तिसरा आर रिसायकल. आता हे कसे करायचे हे समजून घेणे अत्यावश्यक आहे. उदाहरणार्थ आपल्याला कोणी एकेकाळी आनंद देणारी प्लास्टिकची कॅरिबॅग ही पहिल्या आर सदरात आपण रिड्युस करुया म्हणजे तिचा वापर कमी करुया नव्हे वापर बंदच करुया. समजा तरीही एखादी कॅरिबॅग चुकून घरात आलीच तर तिचा रियूज करुया. म्हणजे इतर प्लास्टिकचा कचरा गोळा करुन त्याच्यामध्ये ठेवण्यासाठी तिचा वापर करुया. आणि तिसऱ्या आरला ती रिसायकलला पाठवूया. म्हणजेच ती प्लास्टिकची कॅरिबॅग ही पुनर्वापर प्रकल्पाकडे पाठवण्यासाठी आपण कटिबद्ध होऊया. म्हणजे कालपर्यंत आपल्या गळ्याला फास लावणारी कॅरिबॅग ही तिला तिच्या घरी परत पाठवून पुन्हा आपल्या घरी न आणण्याचा संकल्प करुया. थोडक्यात आपल्या जीवनातून प्लास्टिक कॅरिबॅगला हद्दपार करणे अत्यावश्यक आहे.
- प्रशांत परांजपे, दापोली