
चोरट्यांनी 11 तोळे सोन्यासह रोकड असा तीन लाख 48 हजरांचा ऐवज लंपास केला
रत्नागिरी - शहरातील नाचणेनजिकच्या छत्रपती नगर येथे राहणारे निवृत्त पोलिस कर्मचारी श्रीधर राजाराम सावंत यांचे बंद घर फोडून चोरट्यांनी 11 तोळे सोन्यासह रोकड असा तीन लाख 48 हजरांचा ऐवज लंपास केला.
श्रीधर सावंत हे पत्नीसह ता. 16 नोव्हेंबरला भाऊबीजेनिमित्त कसोप येथे पत्नीच्या माहेरी कुटुंबासह गेले होते. त्यानंतर मंगळवारी ते रत्नागिरीत परतले. त्यानंतर ते पत्नीला घेऊन डॉक्टरांकडे गेले होते. दुपारी ते आपल्या राहत्या घरी आले. यावेळी घराचा मुख्य दरवाजा उघडल्यानंतर आतील खोल्यांचे दरवाजे उघडे असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी बेडरूम मध्ये जाऊन पाहिले असता कपडे व अन्य साहित्य अस्ताव्यस्त पडलेले तसेच घराच्या खिडकीचे गज कापलेले दिसले.
घर बंद असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी खिडकीचे गज कापून आत प्रवेश केला. कपाटातील लॉकरमध्ये असलेले 11 तोळे सोन्याच्या दागिन्यासह रोकड चोरट्यांनी लंपास केली. त्यामध्ये एक लाख 65 हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र, 30 हजार रुपये किमतीची सोन्याची साखळी, सहा हजार रूपयांच्या अंगठ्या, सहा हजार रूपयांच्या सोन्याच्या दोन नथ, 90 हजार रुपयांच्या सोन्याच्या पाटल्या, 45 हजार रुपयांचे ब्रासलेट, सहा हजार रूपयांची रोकड असा तीन लाख 48 हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.
हे पण वाचा - डुकरासाठी फासका लावला आणि हाकनाक बिबट्याचा बळी गेला
याप्रकरणी श्रीधर सावंत यांनी सायंकाळी शहर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी रात्री उशिरा चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरिक्षक अनिल लाड, हे. कॉ, लक्ष्मण कोकरे, पो.नाईक भिसे यांनी कर्मचार्यांसह घटनास्थळी धाव घेतली. पंचानामा करण्यात आला आहे. चोरट्यांचा माग काढण्यासाठी पोलीसांनी पथके तैनात केली आहेत.
संपादन - धनाजी सुर्वे