सिंधुदुर्गात चार ते पाच वाघाचे अस्तित्व असल्याची शक्यता

रूपेश हिराप
बुधवार, 31 जुलै 2019

सावंतवाडी - सिंधुदुर्ग जिल्ह्यात चार ते पाच वाघांचे अस्तित्व असल्याची शक्‍यता चौथ्या व्याघ्र गणनेत व्यक्त करण्यात आली आहे. याआधीही जिल्ह्यात अन्न साखळीतील सर्वात वरच्या स्तरावर असलेल्या वाघाचे अस्तित्व सिद्ध झाले होते; मात्र सावंतवाडी वन विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी व्याघ्र गणनेच्या या अहवालाबाबत साशंकता व्यक्त केली आहे. यामुळे पर्यावरण प्रेमींमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

सावंतवाडी - सिंधुदुर्ग जिल्ह्यात चार ते पाच वाघांचे अस्तित्व असल्याची शक्‍यता चौथ्या व्याघ्र गणनेत व्यक्त करण्यात आली आहे. याआधीही जिल्ह्यात अन्न साखळीतील सर्वात वरच्या स्तरावर असलेल्या वाघाचे अस्तित्व सिद्ध झाले होते; मात्र सावंतवाडी वन विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी व्याघ्र गणनेच्या या अहवालाबाबत साशंकता व्यक्त केली आहे. यामुळे पर्यावरण प्रेमींमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

देशात दर चार वर्षानी होणाऱ्या व्याघ्र गणनेचा अहवाल नुकताच जाहीर झाला. त्यानुसार सिंधुदुर्गात पट्टेरी वाघांचे अस्तित्व दर्शविण्यात आले आहे. शासनाच्या अहवालानुसार सह्याद्री व्याघ्र प्रकल्पासह जिल्ह्यातील तिलारी पर्यंत असलेल्या कॉरीडॉरमध्ये चार ते पाच पट्टेरी वाघांचे अस्तित्व असल्याची शक्‍यता आहे, असे म्हटले आहे.

दोडामार्ग येथे तिलारी जंगलात खासगी कंपनीच्या माध्यमातून लावलेल्या कॅमेरा ट्रॅपमध्ये पट्टेरी वाघाच्या वास्तव्याचे पुरावे सापडले होते. आंबोली, चौकुळ परिसरातही काहींनी प्रत्यक्ष वाघ पाहिल्याचे सांगितले होते. त्यामुळे वाघांचे वास्तव्य आंबोली ते मांगेलीपासून तिलारी परिसरात असल्याचे याआधी अनेकदा स्पष्ट झाले आहे. असे असले तरी पर्यावरणाच्या रक्षणाची जबाबदारी असलेल्या सिंधुदुर्गाच्या वनविभागाने वेळोवेळी या वाघांचे अस्तित्व नाकारले होते; मात्र कॅमेराच्या माध्यमातून पुरावे मिळाल्यानंतर वनविभागही खडबडून जागा झाला होता. तत्कालीन उपवनसंरक्षक नरेश झुरमुरे यांच्या कार्यकालात सिंधुदुर्गात वाघाचे अस्तित्व असल्याचे वनविभागाने अधिकृतरित्या मान्य केले होते. नंतर मात्र पुन्हा वनविभागाने सावध भुमिका घ्यायला सुरवात केली.

आंबोली ते मांगेली या व्याघ्र कॉरीडॉरच्या संवर्धनासाठी सध्या उच्च न्यायालयात खटलाही सुरू आहे. या पार्श्‍वभूमिवर चौथ्या व्याघ्र गणनेत सिंधुदुर्गात वाघाच्या अस्तित्वावर पुन्हा शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. सावंतवाडीचा वनविभाग मात्र याबाबत सावध भूमिका घेताना दिसत आहे.

याबाबत सावंतवाडीचे उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांना विचारले असता ते म्हणाले, ""जिल्ह्यात वाघांचे दर्शन प्रत्यक्ष घेतल्याचे उदाहरण आमच्याकडे नाही. कॅमेराच्या माध्यमातून दोन वर्षापुर्वी पट्टेरी वाघ ट्रप झाल्याने याठिकाणी वाघ असल्याचे अधोरेखित झाले होते. त्याचा अहवालही शासनाकडे प्राप्त आहे; मात्र कॅमेऱ्यात दिसलेला तो वाघ निवासी की भ्रमण करणारा हे निश्‍चित नसल्याने याठिकाणी आज तरी वाघांची नोंद फक्‍त रेकॉर्डवर आहे; परंतु शासनाच्या अहवालानुसार याठिकाणी चार ते पाच वाघाचे अस्तित्व असल्याचे ठामपणे नाकारताही येत नाही व सांगताही येत नाही.''

""सिंधुदुर्गात आंबोली, मांगेली, घोणसरी या सह्याद्री पट्ट्यात विविध खासगी संस्थांनी कॅमेऱ्याच्या माध्यमातून पट्टेरी वाघाचे अस्तित्व सिद्ध केले आहे. सद्यस्थितीत 2 ते 3 पट्टेरी वाघ या पट्ट्यात आहेत हे सत्य आहे. व्याघ्र गणणेची शक्‍यता योग्य आहे.''
- नागेश दप्तरदार,
मानद वन्यजीव संरक्षक, सिंधुदुर्ग.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: There are four to five tigers in Sindhudurg