Ratnagiri : शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात आघाडीसाठी जागा नाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Uday Samant

शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात आघाडीसाठी जागा नाही

दाभोळ : ‘‘पक्षाचे सर्व निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतात. त्यामुळे त्यांनी निवडणुकीसंदर्भात घेतलेले निर्णय आपल्याला मान्य करायला हवेत. ज्या ठिकाणी शिवसेनेचे वर्चस्व आहे, ती जागा दुसऱ्या कोणाला देण्याची आवश्यकता नाही. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात आघाडीसाठी जागा सोडण्याचा प्रश्नच उद्‌भवत नाही. आघाडी करायची असेल तर हा सर्व निर्णय आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर सोडू. तोपर्यंत प्रामाणिकपणे शिवसेनेचे काम करूया,’’ असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केले.

दापोली येथील राधाकृष्ण मंदिर सभागृहात आज शिवसेना कार्यकर्ता मेळावा झाला. शिवसेना सोडून गेलेल्यांना लवकरच पश्चात्ताप, भ्रमनिरास होईल. मात्र त्यांना कोणत्याही परीस्थितीत पुन्हा पक्षात घेऊ नका. भाजपबद्दल बोलताना ते म्हणाले, ‘‘येत्या निवडणुकीत त्यांना राज्यातील जनता मातीमोल केल्याशिवाय राहणार नाही.’’

श्री. सामंत म्हणाले, ‘‘आपल्या राज्यात ८६ जण केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले असून त्यांचा सत्कार मुख्यमंत्री यांच्या हस्ते वर्षा या शासकीय निवासस्थानी करण्यात आला. एवढ्या मोठ्या संख्येने राज्यातून उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या प्रथमच आहे. यापूर्वी जास्तीत जास्त १५ ते २० विद्यार्थी उत्तीर्ण होत असत. मंडणगड तालुक्यात मुंबई विद्यापीठाचे एक मॉडेल कॉलेज असून त्याला मागील सरकारने ५ वर्षात निधीच दिला नाही. मात्र आपल्या विभागामार्फत या महाविद्यालयाला जास्तीत जास्त निधी दिला जाईल.’’

संदीप राजपुरेंना टोला

ज्यांना पक्षाने मोठे केले ते दुसरीकडे गेल्यावर आपण त्यांना विसरले पाहिजे. त्यांचे नाव घ्यायचे टाळले पाहिजे, असा टोला उदय सामंत यांनीराष्ट्र शिवसेनेतून वादीत गेलेले संदीप राजपुरे यांना लगावला.

प्री आयएएस केंद्रासाठी परवानगी देणार

दापोली येथील एखाद्या चांगल्या संस्थेला प्री आयएएस केंद्र सुरू करण्याची परवानगीही देण्यात येईल. जेणेकरून येथील शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचे मार्गदर्शन मिळेल व ते जिल्हाधिकारी होतील. मतदारसंघातील विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणासाठी मुंबई, पुणे येथे जाण्याची आवश्यकता भासणार नाही, याची काळजी घेतली जाईल.

loading image
go to top