बांद्यात थर्मल स्क्रिनिंग बंद 

निलेश मोरजकर
Saturday, 23 January 2021

राज्य शासनाने कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात प्रवेश करणाऱ्या पर्यटकांची तपासणी करण्याचे आदेश दिल्याने 25 नोव्हेंबरला या ठिकाणी थर्मल स्क्रिनिंग नाका उभा करण्यात आला होता.

बांदा (सिंधुदुर्ग) - गोव्याहून महाराष्ट्र राज्यात प्रवेश करणाऱ्या वाहनचालकांचे थर्मल स्क्रिनिंग करण्यासाठी बांदा-सटमटवाडी येथे टोल नाक्‍यावर तपासणी नाके तयार करण्यात आले होते; मात्र या नाक्‍यावर एकही कोरोनाबाधित रुग्ण न सापडल्याने हा तपासणी नाका उद्यापासून (ता. 23) प्रशासनाकडून बंद करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. 

राज्य शासनाने कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात प्रवेश करणाऱ्या पर्यटकांची तपासणी करण्याचे आदेश दिल्याने 25 नोव्हेंबरला या ठिकाणी थर्मल स्क्रिनिंग नाका उभा करण्यात आला होता. या ठकाणी महसूल, पोलिस व आरोग्य विभागाचे कर्मचारी 24 तास तैनात करण्यात आले होते. उद्यापासून हा तपासणी नाका बंद करण्यात येणार असल्याने कर्मचाऱ्यांवरचा भार हलका होणार आहे. 

मध्यंतरीच्या काळात महाराष्ट्र राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढल्याने राज्य शासनाने परराज्यांतून येणाऱ्या पर्यटकांवर निर्बंध घातले होते. नाताळ व वर्षअखेरच्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र राज्यात येणाऱ्यांची संख्या लक्षात घेता व कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यांच्या सीमेवर थर्मल स्क्रिनिंग तपासणी नाके उभे करण्यात आले होते. सिंधुदुर्ग-गोवा सीमेवर महामार्गावर बांदा-सटमटवाडी येथे थर्मल स्क्रिनिंग नाके 25 नोव्हेंबरला उभे करण्यात आले होते. 

यामध्ये स्थानिक ये-जा करणाऱ्या वाहनांना सवलत देण्यात आली होती. या ठिकाणी आरोग्य विभागाचे 3 कर्मचारी, महसूल विभागाचे 2 कर्मचारी, वाहतूक पोलिस शाखेचे 3 कर्मचारी कायमस्वरूपी तैनात ठेवण्यात आले होते; मात्र गोव्यातून महाराष्ट्र राज्यात प्रवेश करण्यासाठी अनेक मार्ग असल्याने या नाक्‍यावर एकही कोरोना रुग्ण सापडला नाही. त्यामुळे हा नाका सुरू ठेवणे प्रशासनाला डोईजड ठरत होते. त्यामुळे उद्यापासून हा नाका प्रशासनाकडून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतची माहिती महसुलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: thermal screening close banda konkan sindhudurg