चोरट्यांचा डोळा आता बंद मंदिरांवर

सकाळ वृत्तसेवा
Friday, 13 November 2020

जिल्ह्यातील काही मंदिर ट्रस्टने सीसीटीव्ही लावले आहेत; मात्र दुर्गम भागात सीसीटीव्ही मंदिरात नाहीत. मंदिरे बंद असल्याचा फायदा चोरट्यांनी उठवला आहे.

रत्नागिरी : लॉकडाउनच्या कालावधीत लांजा व राजापूर तालुक्‍यातील दोन बंद मंदिरांना चोरट्यांनी लक्ष्य केले. दोन दिवसात चोरट्यांनी बोरिवले या गावातील श्री पावणाई मंदिर व राजापुरातील शिवणे येथील श्री कालिकादेवी मंदिराची दानपेटी फोडून रोख रक्कम लंपास करून चोरट्यांनी दिवाळीचा मुहूर्त साधल्याचे चित्र आहे.

ग्रामीण भागात गावापासून काहीशा अंतरावर ग्रामदैवतांची मंदिरे असतात. जिल्ह्यातील काही मंदिर ट्रस्टने सीसीटीव्ही लावले आहेत; मात्र दुर्गम भागात सीसीटीव्ही मंदिरात नाहीत. मंदिरे बंद असल्याचा फायदा चोरट्यांनी उठवला आहे.
या घटना ९ ते १० नोव्हेंबर या कालावधीत घडल्या. लांजा येथील श्री पावणाई देवीच्या मंदिरातील स्टीलच्या दानपेटीच्या पाठीमागील बिजागर उचकटून चोरट्याने ६ हजार रुपयांची रोकड लांबविली, तर कालिकादेवी मंदिरातून दानपेटीत असलेल्या रक्कमेवर डल्ला मारला.

हेही वाचा - फक्त वीस सेकंद, पाच गवे आणि दहा फुट अंतर ; हुशारीमुळेच वाचला जीव -

या प्रकरणी जगन राजाराम गुरव (वय ५०, बोरिवले मधलीवाडी-लांजा) आणि राजापूर तालुक्‍यातून कालिका मंदिराचे पुजारी प्रकाश राजाराम गुरव (वय ५०, रा. गुरववाडी, राजापूर) यांनी राजापूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ग्रामीण भागातील बंद मंदिरातील दानपेट्या फोडून रक्कम लांबविणाऱ्या चोरट्यांचा छडा लावण्याचे आव्हान पोलिसांसमोर ठाकले आहे.

दृष्टिक्षेपात

- सध्याच्या लॉकडाउन काळात ही मंदिरे पूर्णतः बंद 
- काही ठिकाणी पूजा केल्यानंतर मंदिरे होतात बंद
- दिवसभर असणारी ग्रामस्थांची वर्दळही रोडावली 
- राजापूर व लांजा तालुक्‍यातील दानपेट्या फोडल्या

हेही वाचा -  यंदाचा हापूस हंगाम लांबणीवरच ? -

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: thiefer theft a closed temples in ratnagiri money theft from temple