कुडाळात एकाचदिवशी हजारावर बंधारे 

अजय सावंत
Saturday, 12 December 2020

तालुक्‍यात पावशी आणि नेरूर याठिकाणी या मोहिमेचा शुभारंभ डॉ. वसेकर यांच्या हस्ते आज झाला. असा उपक्रम गेली तीन वर्षे राबवून कुडाळ पंचायत समितीने संपूर्ण महाराष्ट्रात एक नविन उच्चांक प्रस्थापित केला आहे.

कुडाळ (सिंधुदुर्ग) - येथील पंचायत समितीच्यावतीने आज एकाच दिवशी प्रशासन आणि लोक सहभागातून तब्बल 1 हजार 81 बंधारे बांधण्यात आले. गेली तीन वर्ष पंचायत समितीच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येत असून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी या लोकचळवळीच कौतुक केले. 

तालुक्‍यात पावशी आणि नेरूर याठिकाणी या मोहिमेचा शुभारंभ डॉ. वसेकर यांच्या हस्ते आज झाला. असा उपक्रम गेली तीन वर्षे राबवून कुडाळ पंचायत समितीने संपूर्ण महाराष्ट्रात एक नविन उच्चांक प्रस्थापित केला आहे. भूजल पातळी वाढवायची असेल तर धावणाऱ्या पाण्याला चालायला शिकवले पाहिजे, चालणाऱ्या पाण्याला थांबायला शिकवले पाहिजे आणि थांबणाऱ्या पाण्याला जमिनीत मुरायला शिकवल पाहिजे, यासाठी पाण्याची साखळी सुरू असतानाच पाणी अडवणं महत्वाचे आहे. म्हणूनच याच महत्व ओळखून येथील पंचायत समितीच्या वतीने गेली तीन वर्ष एकाच दिवशी संपूर्ण तालुक्‍यात लोक सहभागातून बंधारे घातले जातात. यापूर्वी 2017-18 मध्ये 369, 2018-19 मध्ये 719 तर गेल्यावर्षी 753 बंधारे लोकसहभागातून एकाच दिवशी बांधण्यात आले. यावर्षीच्या या उपक्रमाची सुरुवात पावशी मिटक्‍याची वाडी आणि नेरूर वसुसेवाडी इथे बंधारा घालून झाली. 

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वसेकर यांनी श्रीफळ वाढवून या उपक्रमाचा शुभारंभ केला. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित देसाई, सभापती नूतन आईर उपसभापती जयभारत पालव, जिल्हा परिषद सदस्य अमरसेन सावंत, माजी सभापती राजन जाधव, गटविकास अधिकारी विजय चव्हाण, पावशी सरपंच बाळा कोरगावकर, माजी सरपंच पप्या तवटे, उपसरपंच दीपक आंगणे, सहाय्यक बीडीओ मोहन भोइ, लघुपाटबंधारे विभागाचे विवेक नानल, आर. जी. चोडणकर, कृषी अधिकारी प्रफुल वालावलकर, बाळकृष्ण परब, सखाराम सावंत, दत्ताराम आंबेरकर, महादेव खरात, मंदार पाटिल, अमित देसाई, नेरूर सरपंच शेखर गावडे, उपसरपंच समद मुजावर, केंद्रप्रमुख भिकाजी तळेकर, ग्रामविकास अधिकारी सरिता धामापूरकर, वासूदेव कसालकर, प्राथमिक शिक्षक तसेच अंगणवाडी कर्मचारी, ग्रामविकास अधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. 

तालुक्‍याच्या या उपक्रमाचे अनुकरण अन्य तालुक्‍यानी सुद्धा केले पाहिजे, असे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वसेकर यांनी सांगून उपक्रमाचे विशेष कौतुक केले. नेरूर वसुसेवाडी इथे सुद्धा बंधारा बांधण्यात आला. या बंधाऱ्याचाही शुभारंभ डॉ. वसेकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून झाला. पंचायत समितीच्या या उपक्रमाचे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित देसाई आणि सभापती नूतन आईर यांनी अभिनंदन केले. कोणताही शासकीय निधी उपलब्ध नसताना कुडाळ तालुक्‍यात निव्वळ लोकसहभाग व श्रमदानातून एकाच दिवशी 1081 बंधारे बांधण्यात आले. या कामासाठी पंचायत समितीचे सर्व प्रशासकीय विभाग आणि लोकांचे चांगले सहकार्य लाभल्याचे गट विकास अधिकारी विजय चव्हाण यांनी सांगितले. 

नेरुरचाही आढावा 
बंधारा दिनाच्या निमित्ताने गावागावांत बंधारे बांधून पाणी अडवण्यात आले. "तळ्यांचा गाव' असं ज्या गावाचे वर्णन साहित्यिक श्री नेरुरकर यांनी केलं त्या नेरूर गावात नेरूर चव्हाटा इथला इराचा तलाव, नेरूर घाडी वाडीतला काजरे तलाव, गिरबाई तलाव याठिकाणी सुद्धा अधिकारी, कर्मचाऱ्यांनी भेट देऊन आढावा घेतला. 

संपादन - राहुल पाटील 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: thousands dams built one day kudal taluka konkan sindhudurg