धरणे तीन; तरी तहानेने तीनतेरा

नरेश पवार
बुधवार, 17 मे 2017

पेण - मुबलक प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध असतानाही राज्यकर्त्यांची दूषित मानसिकता व सरकारी अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा यामुळे पेण तालुक्‍यातील ३९ गावे व १०३ वाड्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पेण तालुक्‍यात हेटवणे, शहापाडा व आंबेगाव अशी तीन धरणे असताना तालुक्‍यातील वाशी व शिर्की या खारेपाट विभागातील जनतेला हंडाभर पाण्यासाठी रात्र जागवावी लागत आहे. 

पेण - मुबलक प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध असतानाही राज्यकर्त्यांची दूषित मानसिकता व सरकारी अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा यामुळे पेण तालुक्‍यातील ३९ गावे व १०३ वाड्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पेण तालुक्‍यात हेटवणे, शहापाडा व आंबेगाव अशी तीन धरणे असताना तालुक्‍यातील वाशी व शिर्की या खारेपाट विभागातील जनतेला हंडाभर पाण्यासाठी रात्र जागवावी लागत आहे. 

कृती आराखडे कागदावर; टॅंकर लॉबी जोरात  
पेण तालुक्‍यात ३९ गावे व १०३ वाड्यांवर असलेली पाणीटंचाई दूर करण्यासाठी पेण पंचायत समितीतर्फे दर वर्षी कृती आराखडा तयार करण्यात येतो. या वर्षीही टंचाई दूर करण्यासाठी एक कोटी ५५ लाख रुपये खर्चाचा कृती आराखडा तयार करण्यात आला; पण तो कागदावरच राहिला आहे. ३९ गावे व १०३ वाड्यांवर पाणीटंचाई असताना फक्त एका टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. डोलवी येथील जेएसडब्ल्यू स्टील कंपनीतर्फे वाशी विभागासाठी एक व शिर्की विभागासाठी एक अशा दोन खासगी टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पंचायत समितीच्या या भोंगळ कारभारामुळे खासगी टॅंकरमालकांचा धंदा मात्र चांगलाच तेजीत आहे.

योजनेअभावी हेटवणेचे पाणी वाया
खारेपाट विभागातील नागरिकांची पाण्यासाठी वणवण सुरू असताना नवी मुंबईला पाणीपुरवठा करणारे हेटवणे धरण पावसाळ्यानंतरही १२९ दशलक्ष घनमीटर इतके भरलेले असते. यातील साठा पेण तालुक्‍यातील सिंचन व पिण्यासाठी तसेच पेण शहरासाठीही राखीव आहे; मात्र या धरणावरून पेण तालुक्‍यासाठी कोणतीही पाणीपुरवठा योजना आजपर्यंत राबविण्यात आली नाही. यामुळे तालुक्‍यातील सिंचनासाठी व पिण्यासाठी राखीव असलेले पाणी पावसाळ्यापूर्वी भोगावती नदीत सोडण्यात येते. सिंचनासाठी सोडण्यात येणारे पाणी निकृष्ट दर्जाच्या कालव्यांमुळे नदीला व खाडीला जाऊन मिळते.

शहापाडा गाळाने भरले; खारेपाटात विकतचे पाणी
खारेपाट विभागाला पाणीपुरवठा करणाऱ्या शहापाडा धरणातील गाळ मागील अनेक वर्षांपासून काढण्यात न आल्याने हे धरण पूर्णपणे गाळाने भरले आहे. फेब्रुवारीपासून या धरणातील पाणीसाठा संपुष्टात येत असल्याने तेव्हापासूनच खारेपाट विभागात पाणीटंचाईचे चटके सोसावे लागतात. एप्रिल व मे या महिन्यांत धरणांत शिल्लक असलेले गढूळ व दुर्गंधीयुक्त पाणी सोडले जाते; मात्र जुन्या व जीर्ण झालेल्या जलवाहिनीमुळे भाल, शिर्की चाळ आदी शेवटच्या गावांत हे पाणीही पोहचत नाही. शिवाय या पाण्यामुळे रोगराई पसरण्याची शक्‍यता असल्याने खारेपाट विभागातील नागरिकांना पाणी विकत घेण्याशिवाय पर्याय नसतो.

Web Title: three dam, but no water shortage