कणकवलीजवळ दुचाकींची धडक, तीन ठार, पैकी दोघे कोल्हापूर जिल्ह्यातील चुलत भाऊ

राजेश सरकारे
Sunday, 6 September 2020

हा अपघात इतका भीषण होता की एका मोटारसायकलचा चक्काचूर झाला आहे.

कणकवली : भराधाव वेगात येणाऱ्या दोन मोटारसायकलींची शनिवारी समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात तिघे तरुण जागीच ठार झाले. एक जण गंभीर जखमी आहे. अपघात दुपारी दोनच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावर जानवली कृष्णनगरी येथे घडला. 

अपघातात मृतांपैकी दोघेजण चुलत भाऊ असून ते आदमापूर (ता. भुदरगड, जि. कोल्हापूर) येथील आहेत. एकजण राजापूर पाचल (जि. रत्नागिरी) येथील आहे. राजापूर पाचल येथील अस्लम कासम कलोट (23) आणि आदमापूर येथील साताप्पा शिवाजी पाटील (26), अजय हिंदूराव पाटील (20) अशी मृतांची नावे आहेत. पाचल येथील अश्राफ प्रफुल्लकर (23) गंभीर जखमी झाला आहे. त्यांच्यावर पडवे येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

याबाबत घटनास्थळ आणि पोलिसांकडून मिळालेली माहीती अशी : आदमापूर येथील साताप्पा आणि अजय मोटारसायकल (एमएच 08 क्‍यू 5752) ने ओरोस येथे नातेवाईकांना भेटण्यासाठी येत होते. राजापुरातील अश्राफ आणि अस्लम मोटारसायकल (एम एच 10 सीजी 3803) वरून कणकवलीत रुग्णालयात असलेल्या बहिणीला भेटायला आले होते. तेथून परतत असताना अपघात झाला. 
महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे सध्या एकेरी मार्ग सुरू आहेत. त्या एकेरी मार्गावरून दोन्ही मोटारसायकलस्वार भरधाव वेगाने निघाले असता त्यांची जानवली येथील कृष्णनगरी जवळ जोरदार धडक झाली. दोन्ही गाड्या रस्त्यावर फेकल्या गेल्या. त्यावरील चौघेही रस्त्यावर आपटल्याने गंभीर जखमी झाले. यातील तिघांचा जागीच मृत्यू झाला. 

हा अपघात इतका भीषण होता की एका मोटारसायकलचा चक्काचूर झाला आहे. गंभीर जखमी असलेल्या प्रफुल्लकर याला येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले; मात्र त्यांची प्रकृती आणखी खालावली. त्यामुळे त्याला तत्काळ पडवे येथील मेडिकल कॉलेजमध्ये हलविण्यात आले आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच नातेवाईक येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले होते. घटनास्थळाचा पंचनामा पोलिस उपनिरीक्षक प्रकाश कदम, ममता जाधव आणि पोलिस नाईक मनोज गुरव यांनी केला. 

पाटील कुटुंबाला मोठा धक्‍का 
साताप्पा पाटील त्याची बहीण महिला पोलिस शारदा पाटील (ओरोस) यांना भेटण्यासाठी येत होता. सोबत अजय पाटील होता. साताप्पा अलीकडेच रेल्वेत नोकरीला लागला होता. या घटनेमुळे पाटील कुटुंबाला मोठा धक्‍का बसला आहे. साताप्पा पाटील मिरज येथे रेल्वे खात्यात पॉईन्टमन या पदावर नोकरीस आहे. साताप्पाच्या मागे आई, वडील, एक विवाहीत व एक अविवाहित बहिण असा परिवार आहे. अजय पाटील याच्या मागे आई-वडील, एक भाऊ असा परिवार आहे. अपघातातील अजय पाटील याचे घटनास्थळी आधारकार्ड सापडल्याने स्थानिक नागरिकांनी याबाबतची माहिती आदमापूर येथे कळविली. 

बहिणीची भेट ठरली शेवटची 
पाचल येथील अस्लम कलोट हा तरुण ट्रक चालक आहे. लॉकडाउनमुळे सध्या तो घरीच होता. कोळपे (ता. वैभववाडी) येथे सासर असलेल्या अस्लमच्या बहिणीचे दोन दिवसापूर्वी बाळंतपण झाले. त्यामुळे बहिणीला भेटण्यासाठी अस्लम स्वतःच्या मोटारसायकलने येत होता. त्यांच्या मागे अश्रफ बसलेला होता. धडक बसली तेव्हा अश्रफ रस्त्याच्या बाजूला फेकला गेल्याने त्याला गंभीर दुखापत झाली आहे. 

संपादन ः विजय वेदपाठक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three killed in two-wheeler collision near Kankavali, two of them cousins ​​from Kolhapur district