
रत्नागिरी : अवकाळीचा तीन तालुक्यांना तडाखा; लाखोंचा फटका
रत्नागिरी - वेगवान वाऱ्यासह पडलेल्या गारांच्या अवकाळी पावसाने दापोली, चिपळूण, संगमेश्वर या तीन तालुक्यांना तडाखा बसला. यामध्ये घरा, गोठ्यांचे २३ लाखांचे नुकसान नोंदले गेले असून एकट्या संगमेश्वर तालुक्यातील आठ गावांतील १२० मालमत्तांचा समावेश आहे. या तालुक्यातील नुकसानीचा आकडा बावीस लाखांपर्यंत गेला आहे. यामध्ये वाडाविसराड गावातील एका घरावर वीज पडून नुकसान झाले. सुदैवाने ग्रामस्थांना दुखापत झाली नाही.
जिल्ह्यात रविवारी (ता. २४) सकाळी ८. ३० वाजेपर्यंतच्या चोविस तासात सरासरी २. ८९ मि.मी. पावसाची नोंद झाली. त्यात संगमेश्वर २० मि.मी., रत्नागिरी ४, लांजा २ मि.मी. पावसाचा समावेश आहे. शुक्रवारी सायंकाळी अचानक पावसाला सुरवात झाली. हवामान विभागाकडून पावसासंदर्भात सतर्कतेचा इशारा पूर्वीच दिला होता. विजांच्या कडकडाटासह वादळसदृश्य स्थिती संगमेश्वर, खेड, दापोली तालुक्यात होती. संगमेश्वरमध्ये गारांसह मुसळधार पाऊस कोसळला. झाडे उन्मळून घरा, गोठ्यावर पडून नुकसान झाले. काहीच्या छताचे कौले, पत्रे उडून गेले. संगमेश्वर तालुक्यात सुमारे दोन तास वाऱ्याचे तांडव सुरु होते. १२० घरे, गोठे आणि मंदिराचे नुकसान झाले. त्यात धामापूरतर्फे संगमेश्वरमधील २० मालमत्तांचे पावणेदोन लाखाचे, डिंगणी कुरण येथील १४ घरांचे चार लाखाचे, फुणगुसमधील एका घराचे ४७ हजार रुपये, नारडुवेमधील ६७ मालमत्तांचे १५ लाख रुपये, असावेतील चार घरांचे ४० हजार रुपये तर वाडाविसराड येथील एका घरावर वीज कोसळून ३५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. याचे पंचनामे केले असून नुकसान भरपाईसाठी प्रस्ताव पाठवणार आहेत. यातील काही घरांचे पंचनामे अद्यापही झालेले नाहीत. दापोलीत पिसईतील तीन घरांचे व पालघरमधील एका घराचे १३ हजार रुपये, चिपळूण तालुक्यातील तिवरे, धेंदवाडी, धनगरवाडीतील तीन घरांचे दहा हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
एक नजर...
चोवीस तासांत सरासरी पाऊस : २.८९ मि. मी.
संगमेश्वर : २० मि. मी.
रत्नागिरी : ४ मि. मी.
लांजा : २ मि. मी.
Web Title: Three Taluka Hit Unseasinal Rain In Ratnagiri District
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..