गुहागर समुद्रात थरारक रेस्क्‍यू ऑपरेशन 

Thrilling rescue operation in Guhagar sea
Thrilling rescue operation in Guhagar sea

गुहागर : येथील समुद्रकिनाऱ्यावर बनाना राईडसाठी गेलेले आठ पर्यटक जेट स्की बंद पडल्याने खोल समुद्रात अडकले होते. प्रदेश तांडेल पोहत त्यांच्यापर्यंत पोचला. रेस्क्‍यू बोर्डला बनाना बोट बांधून प्रदेशने पर्यटकांना किनाऱ्यावर सुखरूप आणले. आठवडाभरापूर्वी पाच वर्षाच्या मुलीलाही समुद्रात वाहून जाताना प्रदेशने वाचवले होते. त्यामुळे गुहागर समुद्रकिनाऱ्यावरील पर्यटकांसाठी तो देवदूत ठरला आहे. 

गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर नगरपंचायतीतर्फे चालविण्यात येणारी जीवरक्षक यंत्रणा पर्यटकांसाठी महत्त्वाची ठरत असल्याचा प्रत्यय वारंवार येत आहे. कोरोनाच्या संकटानंतर गुहागरमध्ये पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे. येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी गुहागरचा स्वच्छ समुद्रकिनारा आकर्षणाचे मुख्य केंद्र आहे. अनेक पर्यटक समुद्रस्नान, ऍडव्हेंचर स्पोर्टस्‌चा आनंद लुटतात. रविवारी आठ पर्यटकांना वाचवताना प्रदेश समुद्रात किनाऱ्यापासून सुमारे 600 मीटर दूर, 4 ते 5 वाव खोल समुद्रात गेला. जेट स्कीपासून बनाना बोट वेगळी केली. बोटीचा दोर रेस्क्‍यू बोर्डला बांधला आणि पर्यटकांसह बनाना बोट ओढत समुद्रकिनाऱ्यावर आणली. वाऱ्याच्या वेगाची दिशा दक्षिणेकडे असल्याने सुमारे तासाभराच्या अथक प्रयत्नांनतर पर्यटक समुद्रकिनाऱ्याला पोचले. 
 
मुलीच्या जिवावर बेतला 
आठवडाभरापूर्वी जीवरक्षक ओरडतात म्हणून 1 कुटुंब जीवरक्षकांपासून दूर जेटीजवळ आपल्या पाच वर्षांच्या मुलीसह समुद्रलाटांशी खेळत होते. हा खेळ पाच वर्षाच्या मुलीच्या जिवावर बेतला. ओहोटीच्या लाटांनी मुलीला समुद्रात ओढले. जेटीजवळचा दगड धरताना तिला खरचटलं. आरडाओरडा ऐकून प्रदेश तिथे पोचला. आणि त्या मुलीचा जीव वाचवला. 
 
...अन प्रदेश समुद्रात झेपावला 
रविवारी (ता. 20) आठ पर्यटक बनाना बोटीवर बसल्यावर बोट जेट स्कीद्वारे ओढत खोल समुद्रात नेली. तेथे मोठ्या लाटांवर स्वार होण्याचा आनंद लुटत असतानाच या बोटीला बांधलेला दोर जेट स्कीच्या पंख्यात अडकला. जेट स्की बंद पडली. बनाना बोटीवरील नियंत्रण सुटले. पर्यटकांना मोठ्या लाटांमध्ये मृत्यू दिसू लागला. बनाना बोट किनाऱ्यावर न्यायची कशी, म्हणून जेट स्कीच्या चालकाने मदतीसाठी किनाऱ्यावरील जीवरक्षकांना हाका मारल्या. 
काहीतरी गडबड आहे, हे लक्षात आल्यावर जीवरक्षक प्रदेश तांडेल रेस्क्‍यू बोर्ड घेऊन समुद्रात झेपावला. 

27 पर्यटकांचे प्राण वाचवले 
गेली दोन वर्षे गुहागर नगरपंचायतीतर्फे त्याची जीवरक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. गेल्या सात वर्षात प्रदेशने 27 पर्यटकांचे प्राण वाचवले आहेत. प्रदेश तांडेल 2014 पासून गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांना ऍडव्हेंचर स्पोर्टस्‌च्या सुविधा देणाऱ्या संस्थेबरोबर काम करतो. 

संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com