रत्नागिरी जिल्ह्यातील तेरा धरणे "ओव्हर फ्लो' 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 जुलै 2019

रत्नागिरी - गेल्या पंधरवड्यात पडलेल्या मुसळधार पावसाने रत्नागिरी जिल्ह्यातील पाटबंधारे विभागाकडील 65 पैकी तेरा धरणे "ओव्हर फ्लो' झाली आहेत. त्यामुळे धरणाखालील नदी किनारी भागातील लोकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

रत्नागिरी - गेल्या पंधरवड्यात पडलेल्या मुसळधार पावसाने रत्नागिरी जिल्ह्यातील पाटबंधारे विभागाकडील 65 पैकी तेरा धरणे "ओव्हर फ्लो' झाली आहेत. त्यामुळे धरणाखालील नदी किनारी भागातील लोकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

जिल्ह्यात पाटंबधारेची 65 धरणे असून नातूवाडी, गडनदी आणि अर्जुना हे मध्यम प्रकल्प आहेत. उर्वरित सर्व लघु प्रकल्प आहेत. यातील 16 धरणे जलसंधारण विभाग, 49 धरणे पाटबंधारे विभाग आणि मंडळाच्या अखत्यारित येतात. जिल्ह्यात मान्सूनला उशिरा सुरवात झाली असली तरी धरणक्षेत्रात बऱ्यापैकी पाऊस पडल्याने 13 धरणे ओव्हर फ्लो झाली आहेत. 22 धरणात निम्याहून अधिक पाणीसाठा जमला आहे. अर्जुना मध्यम प्रकल्प 100 टक्के भरले असून, नातूवाडी मध्यम प्रकल्प 52.95 टक्के आणि गडनदी मध्यम प्रकल्प 70.88 टक्के भरले आहे.

जिल्ह्यातील मंडणगड तालुक्‍यातील पणदेरी, दापोली तालुक्‍यातील सोंडेघर, सुकोंडी आणि पंचनदी, चिपळूण तालुक्‍यातील फणसवाडी, मालघर आणि खोपड, संगमेश्‍वर तालुक्‍यातील तेलेवाडी, रत्नागिरीतील शीळ, लांजा तालुक्‍यातील मुचकुंदी आणि इंदवटी तर राजापूर तालुक्‍यातील अर्जुना मध्यमप्रकल्प आणि गोपाळवाडी ही धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. खेड आणि गुहागर तालुक्‍यात कमी पाऊस पडल्याने अद्याप एकही धरण पूर्ण क्षमतेने भरलेले नाही. जिल्ह्यातील पाटबंधारेच्या सर्व धरणात मिळून 2 कोटी 47 लाख 44 हजार दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thy dams in the Ratnagiri district Overflow