
तिलारी प्रकल्पाधिकाऱ्यांनी कालव्याचे पाणी बंद केल्याने धोका टळला. अर्थात रात्रीच्या वेळी कालवा फुटला असता तर मोठी दुर्घटना घडली असती.
दोडामार्ग (सिंधुदुर्ग) - तालुक्यातील खानयाळे येथे तिलारीचा डावा कालवा फुटला आणि एकच हाहाकार उडाला. कालव्याचे पाणी शेती बागायतीत घुसून मोठे नुकसान झाले. गाळ, मातीसह पाणी कालव्यापासून चार किलोमीटरपर्यंत पोचले. त्यामुळे दोडामार्ग कोल्हापूर मार्गावर असलेल्या साटेली-आवाडे येथील पुलावर पाणी येऊन त्या मार्गावरील वाहने दोन तासांहून अधिक काळ अडकून पडली. तिलारी प्रकल्पाधिकाऱ्यांनी कालव्याचे पाणी बंद केल्याने धोका टळला. अर्थात रात्रीच्या वेळी कालवा फुटला असता तर मोठी दुर्घटना घडली असती.
तिलारीतून गोव्याकडे पाणी नेणाऱ्या कालव्याला काही दिवसांपासून गळती लागली होती. त्यामुळे कालवा फुटणार याचे संकेत मिळत होते. अनेक शेतकऱ्यांनी त्याबाबत प्रकल्पाधिकाऱ्यांना कल्पना दिली होती; पण त्यांनी दुर्लक्ष केल्याने अखेर आज दुपारी अडीचच्या दरम्यान कालवा फुटलाच. कालवा फुटून धो धो पाणी वाहू लागले. नंतर ते पाणी पाईपमधून खालच्या भागातून साटेली-भेडशी आणि आवाडे परिसरात पोचले. पाण्यामुळे दोडामार्ग कोल्हापूर मार्गावरील पूल पाण्याखाली गेले. त्यामुळे दोन्ही बाजूला शेकडो लहान-मोठी वाहने जवळपास दोन तास अडकून पडली. कालवा फुटून बाहेर पडलेल्या पाण्यासोबत आलेला गाळ आणि माती शेती बागायतीत घुसून मिरची, नाचणी आदी पिकांचे नुकसान झाले.
लावणी केलेली मिरची आणि नाचणी पाण्याच्या वेगवान प्रवाहाबरोबर वाहून गेल्याने आयनोडे येथील शेतकरी एल. बी. सावंत यांचे नुकसान झाले. त्यांनी भरपाई देण्याबरोबरच कालव्याची कामे दर्जेदार करण्याची मागणी केली.
पुलावर पाणी आल्याने अनेक प्रवासी अडकून पडले. प्रभारी पोलिस निरीक्षक महेंद्र घाग, सहायक पोलिस निरीक्षक कुलदीप पाटील आदींनी पुलावर उपस्थित राहून पाण्यात वाहने घालणाऱ्या अतिउत्साही वाहनचालकांना समज देण्याचा प्रयत्न केला. तरीही वाहनचालक पाण्यातून वाहने हाकत होते. अखेर पाचनंतर वाहतूक एकेरी मार्गाने सुरू करण्यात आली.
...तर अनर्थ घडला असता
दिवसा कालवा फुटून अचानक पाणी पुलावर आल्याने पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे वाहने अडकून पडली. या मार्गावरून आंध्र प्रदेश, तेलंगणा कर्नाटक, मुंबई, दिल्ली आणि अन्य राज्यांतील पर्यटकांच्या गाड्या दिवस-रात्र धावत असतात. कालवा रात्रीच्या वेळी फुटला असता तर मोठा अनर्थ घडला असता.
दुसऱ्यांदा कालवा फुटला
कालवा फुटला त्याच्या वरच्या बाजूला काही वर्षांपूर्वी कालवा फुटून मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर पुन्हा आता कालवा फुटला. फुटलेला कालवा नव्याने बांधलेला होता; पण काही वर्षांतच तो फुटल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
फुटलेला कालवा पुन्हा बांधण्यासाठी काही महिने जातील. त्या काळात गोव्याचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. लवकरात लवकर पंचनामे, दुरुस्ती अंदाजपत्रक करून गोव्याला पाणी देण्याचे प्रयत्न राहतील.
- श्री. आसगेकर, प्रकल्पाधिकारी.
संपादन - राहुल पाटील