घाटात माकडाला बिस्किट देण्यासाठी गेला पुढे अन्...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 डिसेंबर 2019

पाटण येथील सात जण चिपळूण खेर्डी येथे लिफ्ट उभारणीचे काम करण्यासाठी गुरुवारी (ता. 26) सकाळी आले होते. खेर्डी येथील एका सदनिकेचे काम पूर्ण करून सायंकाळी चार वाजता ते सातही जण परतीच्या मार्गाला लागले.

चिपळूण ( रत्नागिरी ) - कुंभार्ली घाटात माकडाला बिस्किट देण्यासाठी पुढे आलेल्या तरुणाचा तोल गेल्यामुळे दरीत कोसळून त्याचा मृत्यू झाला. सुरेश विभूते असे त्या तरुणाचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. 26) सायंकाळी साडेपाच वाजता घडली. 

पाटण येथील सात जण चिपळूण खेर्डी येथे लिफ्ट उभारणीचे काम करण्यासाठी गुरुवारी (ता. 26) सकाळी आले होते. खेर्डी येथील एका सदनिकेचे काम पूर्ण करून सायंकाळी चार वाजता ते सातही जण परतीच्या मार्गाला लागले. त्यातील पाच जण मोटारीतून तर दुचाकीवरुन दोघे असे सात जण पाटणकडे रवाना झाले. साडेपाच वाजण्याच्या दरम्यान ते कुंभार्ली घाटात पोचले. चार चाकीमध्ये बसलेले सुरेश विभूते हे माकडाला बिस्कीट देण्यासाठी घाटात थांबले. विभूते यांच्याबरोबर गाडीतील उर्वरित चौघेही खाली उतरले. त्याच्याबरोबर असलेले दुचाकीवरील दोघे पुढे निघून गेले. विभुते बिस्कीट देण्यासाठी कठड्यावर उभे होते. त्यांनी एक पाय कठड्यावरुन खाली टाकला होता. माकडाला बिस्कीट देत असताना अचानक विभुते याचा तोल गेला आणि ते दोनशे फूट खोल दरीत कोसळले. दरीत कोसळताना त्यांनी वाचवण्यासाठी किंकाळी ठोकली.

हेही वाचा - रत्नागिरीत काँग्रेस भुवनला का लावले टाळे ? 

विभुते यांचा मृतदेह बाहेर काढण्यात यश

दरीत कोसळलेले विभूते हे जागीच ठार झाले. त्यांच्याबरोबर असलेल्या चौघांनी ही माहिती शिरगाव पोलिस ठाण्यात कळवली. पोलिस आणि ग्रामस्थ तत्काळ घटनास्थळी पोचले. त्यानंतर दरीत कोसळलेल्या विभुते यांचा शोध घेण्यास सुरवात केली. काळोखामुळे शोध मोहिमेत थोडासा अडथळा येत होता. साडेसात वाजण्याच्या सुमारास विभुते याचा मृतदेह खोल दरीतून वर काढण्यात शोध पथकाला यश आले. याप्रकरणी खेर्डी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. 

हेही वाचा - भाजपमधून हीची हकालपट्टी; नगराध्यक्षपदासाठीची बंडखोरी भोवली 

हनुमान व्यायाम मंडळाची मदत 

हनुमान व्यायाम मंडळ पोफळीचे कार्यकर्ते अनंतशेठ साळवी, सुहाश शिंदे, प्रतीक शिंदे, दीपक शिंदे, सुधाकर कदम, शिवाजी बडदे, उदय पोटे आदींच्या टीमने 200 फूट दरीतून मृतदेह वर आणला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: At The Time Of Bis kit Feeding To Monkey Youth Fall In Ghat Ratnagiri Marathi News