गणेशोत्सव पार्श्वभूमीवर तिथवली ग्रामनियंत्रण समितीचा महत्त्वाचा निर्णय

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 जुलै 2020

उत्सवकाळात कोरोनाचा संसर्ग वाढु नये म्हणून प्रत्येक गावात नियोजन सुरू आहे. तिथवली ग्रामपंचायतीने देखील अशाच प्रकारे कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनाच्या अनुषंगाने नियोजन केले आहे. 

वैभववाडी (सिंधुदुर्ग) - ज्या चाकरमान्यांना गणेशोत्सवाला यायच आहे, त्यांनी 5 ऑगस्टपूर्वीच गावात यावे. गावात संस्थात्मक विलगीकरण कक्षाची सोय नसल्यामुळे राहण्यासाठी स्वतंत्र घराचे नियोजन करूनच यावे, असे आवाहन तिथवली ग्रामनियंत्रण समितीने केले आहे. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून गावात आरती, सत्यनारायण पुजा करण्यास मज्जाव करण्यात आल्याचेही स्पष्ट केले आहे. 

यापुढील काळात येणाऱ्या सर्वच सण, उत्सवांवर कोरोनाचे सावट असणार हे निश्‍चित आहे; परंतु कोकणातील सर्वांत मोठा सण म्हणून ओळखला जाणारा गणेशोत्सवाला 22 ऑगस्टपासून सुरूवात होणार आहे; परंतु कोरोनाचे सावट या उत्सवांवर देखील आहे. जिल्ह्यात कोरोनाच्या रूग्णांचा आकडा 200 च्या वर गेला आहे. त्यामुळे या उत्सवकाळात कोरोनाचा संसर्ग वाढु नये म्हणून प्रत्येक गावात नियोजन सुरू आहे. तिथवली ग्रामपंचायतीने देखील अशाच प्रकारे कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनाच्या अनुषंगाने नियोजन केले आहे. 

गणेशोत्सव काळात अचानक चाकरमानी गावात आले तर प्रशासनाची धांदल उडु शकते. त्यामुळे ग्रामपंचायतीने आतापासूनच तयारी केली आहे. यासंदर्भात नुकतीच ग्रामनियत्रंण समितीची एक बैठक झाली. या बैठकीत ज्या चाकरमान्यांकडे गावात स्वतंत्र घर आहे. त्यांनी 5 ऑगस्टपूर्वी गावात यावे. जेणेकरून त्यांना 14 दिवसाचा गृहविलगीकरणाचा कालावधी पुर्ण करता येईल. गणेशोत्सव काळात ग्रामस्थांनी एकत्रित आरती, भजने करू नयेत किंवा सत्यनारायण पुजेचे देखील आयोजन करू नये, असा ठराव करण्यात आला. गौरी गणपती विसर्जनावेळी सामाजिक अंतर प्रत्येक ग्रामस्थाने ठेवावे. विनाकारण गावात फिरणे, मास्क न लावता फिरणाऱ्यांवर 500 रूपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. आपले आप्तेष्ट, पाहुण्यांना उत्सव काळात गावात निमंत्रित करू नये, असे आवाहन देखील समितीने केले आहे. 

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी ग्रामनियत्रंण समितीने एक बैठक घेऊन गणेशोत्सवाचे नियोजन केले आहे. गावात संस्थात्मक विलगीकरण कक्ष नसल्यामुळे अचानक येणाऱ्या चाकरमान्यांची गैरसोय होऊ नये, म्हणून बैठकतील निर्णय इतक्‍या लवकर जाहीर करून लोकांपर्यत पोहोचविण्याचा प्रयत्न आहे. 
- प्रशांत जाधव, ग्रामसेवक, ग्रामपंचायत तिथवली  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tithwali Gram Panchayat meeting for the servants