कोकण पद्धतीचा पहिला बंधारा नाटळमध्ये पूर्णत्वास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोकण पद्धतीचा पहिला बंधारा नाटळमध्ये पूर्णत्वास
कोकण पद्धतीचा पहिला बंधारा नाटळमध्ये पूर्णत्वास

कोकण पद्धतीचा पहिला बंधारा नाटळमध्ये पूर्णत्वास

sakal_logo
By

72389
नाटळ ः येथील कोकण पद्धतीच्या बंधाऱ्यांची पाहणी करताना सतीश सावंत. शेजारी बंड्या सावंत, बाळा पाटकर आदी. (छायचित्र ः तुषार सावंत)
----------

कोकण पद्धतीचा पहिला बंधारा नाटळमध्ये पूर्णत्वास

आज लोकार्पण; ‘जलसमृद्ध कोकण’, दिगंत स्वराज्य फाउंडेशन, ‘नाटळ ग्रामविकास’चा पुढाकार

कणकवली,ता. १ ः जलसमृद्ध कोकण प्रतिष्ठान व दिगंत स्वराज्य फाउंडेशनच्या माध्यमातून व नाटळ ग्रामविकास मंडळाच्या पुढाकाराने सिंधुदुर्गातील पहिल्या कोकण पद्धतीच्या बंधाऱ्याचे काम पूर्ण झाले. या बंधाऱ्यात पाणीसाठा झाला असून या बंधाऱ्याचे उद्या (ता.२) सकाळी दहाला लोकार्पण होणार आहे. यावेळी कोकण भूमी प्रतिष्ठान अध्यक्ष जलनायक संजय यादवराव, दिगंत स्वराज फाउंडेशन अध्यक्ष जलनायक राहुल तीवरेकर आणि नाटळ जलसमृद्धी अभियान प्रमुख विश्वनाथ सावंत यांची उपस्थिती असेल.
गावचा शाश्वत विकास करायचा असेल तर सर्वप्रथम गावातील नदीला महत्त्व दिले पाहिजे. कोकणात भरपूर पाऊस पडतो तरीही एप्रिल, मे महिन्यात पाणी नसते, याचे प्रमुख कारण पाण्याचे नियोजन झाले नाही. कोकणातील ग्रामस्थ मंडळाने नदी व्यवस्थापन व पाणी व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक. या उद्देशाने राज्याचे माजी मुख्य सचिव द. म. सुकथनतकर यांच्या स्वनिधीतून आणि देणगीतून तसेच गावच्या लोकवर्गणीच्या माध्यमातून हा नाटळ येथे पहिला बंधारा यशस्वीपणे बांधण्यात आला. या बंधाऱ्यात साधारण दोन कोटी लिटर पाणी साठवणूक क्षमता निर्माण झाली. गावातील याच नदीवर अजून तीन-चार बंधारे झाले तर या संपूर्ण गावाच्या पाण्याची समस्या कायमस्वरूपी सुटेल. याच पाण्याच्या माध्यमातून व आधुनिक शेतीच्या माध्यमातून गावामध्ये आर्थिक समृद्धीही आणता येईल, याबाबत यावेळी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
---
अर्ध्या तासाची परिषद
‘आपल्या गावच्या पाण्याचे आणि नदीचे नियोजन कसे करायचे’ या विषयावरती एक अर्ध्या दिवसाची परिषद सकाळी नऊ ते दुपारी चारपर्यंत पहिल्यांदाच सिंधुदुर्ग जिल्ह्यात आयोजित केली आहे. या परिषदेमध्ये हा बंधारा व असे शंभरहून अधिक बंधारे ज्यांनी बांधले आहेत, असे जलनायक राहुल हिवरेकर आणि कोकण भूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष जलनायक संजय यादवराव हे मार्गदर्शन करणार आहेत.
--
कोकणवासीयांना साद
सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात जल व्यवस्थापन आणि नदी संवर्धनाची चळवळ पुढे नेण्याच्या दृष्टीने व भविष्यातील या विषयातील दिशा यावर या परिषदेत चर्चा होईल. या दोन्ही जिल्ह्यात पाणी विषयात जे काम करत आहेत किंवा भविष्यात आपल्या गावामध्ये नदी संवर्धन, बंधारे या विषयात ज्यांना काम करायचे आहे, अशा कोकणवासीयांनी या परिषदेला आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन नाटळ ग्रामविकास मंडळाने केले आहे. उद्या सकाळी ९ ते १० यावेळेत नाटळ येथील कोकण टाईप बंधारा लोकार्पण सोहळा होईल.
---
प्रत्यक्ष बंधाऱ्यावर मार्गदर्शन सत्र
कोकणात स्पेशल डिजाईनचे कोकण टाईप बंधारे कसे बांधावेत, हे सत्र प्रत्यक्ष बंधाऱ्यावर होईल. सकाळी दहा ते दुपारी दीडपर्यंत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात नदी संवर्धन कशा पद्धतीने केले पाहिजे. गाळमुक्त नदी आणि जलयुक्त नदी, नदीवर साखळी बंधाऱ्यांचे नियोजन आणि लोकसहभागाची आवश्यकता या विषयी नाटळ रामेश्वर मंदिर येथे मार्गदर्शन होणार आहे. त्यानंतर भोजन व दुपारी तीन ते चार मुक्त चर्चा आणि प्रश्नोत्तरे, असा हा कार्यक्रम होणार आहे.