सावंतवाडीत साकारली भव्य हनुमंताची मूर्ती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सावंतवाडीत साकारली 
भव्य हनुमंताची मूर्ती
सावंतवाडीत साकारली भव्य हनुमंताची मूर्ती

सावंतवाडीत साकारली भव्य हनुमंताची मूर्ती

sakal_logo
By

72487
सावंतवाडी ः मांजरेकर यांनी साकारलेली हनुमंताची भव्य मूर्ती.

सावंतवाडीत साकारली
भव्य हनुमंताची मूर्ती
मांजरेकरांची कल्पकता; छबी टिपण्यासाठी गर्दी

सावंतवाडी, ता. १ ः येथील प्रसिद्ध मूर्तिकार विलास मांजरेकर व ओंकार मांजरेकर यांनी महाबली पवनपुत्र हनुमंताची भव्य मूर्ती साकारली आहे. पर्यटननगरी मालवण येथील एका भक्ताच्या मागणीनुसार ही तब्बल १७ फूट उंच मूर्ती साकारण्यात आली आहे. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर ही मूर्ती मालवणनगरीत उभारली जाणार असून पर्यटकांसाठी ही मूर्ती एक वेगळे व खास आकर्षण ठरणार आहे. विलास मांजरेकर यांच्या चित्रशाळेत काल (ता. ३१) या मूर्तीचे काम पूर्ण झाले. याबाबत मांजरेकर यांच्याशी संवाद साधला असता, गेले सहा महिने आम्ही ही मूर्ती घडविण्यासाठी अपार मेहनत घेतली. दोन वर्षांपूर्वी ती साकारण्याचा मानस मालवण येथील एका हनुमान भक्ताने व्यक्त केला. आतापर्यंत मारुतीची भव्य मूर्ती साकारण्याचा योग आला नव्हता. तो यानिमित्ताने घडून आला. एक कलाकार म्हणून हा आनंद शब्दांत सांगणे कठीण आहे, अशी भावना मूर्तिकार विलास मांजरेकर यांनी व्यक्त केली. सावंतवाडी-माजगाव येथील मूर्तिकार विलास मांजरेकर गेली अनेक वर्षे मूर्ती कलेत कार्यरत आहेत. त्यांच्या असंख्य कलाकृती राज्याच्या कानाकोपऱ्यात पाहायला मिळतात. त्याचबरोबर गोवा, कर्नाटक आदी भागातही त्यांनी साकारलेल्या मूर्ती दिसून येतात. त्यांच्यासह मांजरेकर कुटुंब गेली अनेक वर्षे या क्षेत्रात कार्यरत आहेत. हनुमंताची १७ फुटी मूर्ती लक्षवेधी ठरत असून ती पाहण्यासाठी व मोबाईलमध्ये छबी टिपण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती.