
संक्षिप्त
नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत
चिपळूण, ता. १ : चिपळूण व गुहागर तालुक्यात दाखल झालेल्या जवळपास ५० हजारहून अधिक पर्यटकांनी सरत्या वर्षाला निरोप देत उत्साह आणि जल्लोषात नवीन वर्षाचे स्वागत केले. येथील प्रमुख समुद्र किनारे, खाडी किनारे, पर्यटन स्थळांवर शनिवारी सकाळपासून आनंदाला उधाण आले होते.
शहरातील आणि महामार्गावर वाहनांची तोबा गर्दी झाली होती. फटाक्यांची आतषबाजी, जल्लोष करीत, एकमेकांना शुभेच्छा देत तर काहींनी नवीन संकल्प करीत नववर्षाचे स्वागत केले. कोणताही गैरप्रकार घडू नये म्हणून पोलिस प्रशासन, महसूल, प्रशासन व राज्य उत्पादन शुल्क आदी विविध यंत्रणेने कंबर कसल्याचे दिसून आले. नववर्षाचे स्वागत सर्वांना आनंदात करता यावे यासाठी पोलिस प्रशासनाने काहीदिवसापासून तयारी केली होती. त्यामुळे नागरिकांना सरत्या वर्षाला उत्साहात निरोप देता आला. दोन वर्षांच्या खंडानंतर सर्वांना हा सोहळा साजरा केला. गत वर्षी कोरोनामुळे जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर लावण्यात आलेले निर्बंध कायम होते. ही कसर अनेकांनी यंदा भरून काढली.