
हर्णै-दापोलीतील किनाऱ्यांवर पर्यटकांची तोबा गर्दी
KOP23L72442
दापोलीतील किनाऱ्यांवर पर्यटकांची तोबा गर्दी
नव्या वर्षाचे जल्लोषात स्वागत ; मुरुड बीचवर पर्यटकांचा डीजेच्या तालावर डान्स
हर्णै, ता. 1 ः नवीन वर्षाच्या स्वागतासाठी दापोली तालुक्यातील किनारपट्टीवर नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांनी गेले आठवडाभर प्रचंड गर्दी केली आहे. त्यामुळे संपूर्ण दापोली तालुका पर्यटकांनी गजबजून गेला आहे.
शाळा, कॉलेजला नाताळची सुट्टी आणि थर्टी फस्टला लागून आलेली शनिवार, रविवारची सुट्टी यामुळे पर्यटक दोन ते तीन दिवस अगोदरच दापोलीत दाखल झाले आहेत. अनेक पर्यटक 30 ला सायंकाळीच किनाऱ्यावर दाखल झाले. 31 डिसेंबरला सायंकाळी सूर्यास्तावेळी मुरुड बीचवर डीजेच्या तालावर पर्यटकांनी डान्स करत सरत्या वर्षाला निरोप दिला. सायंकाळी 6 वाजल्यापासूनच पर्यटकांनी मुरुड किनारा फुलून गेला होता. तसेच हर्णै बंदरातही रात्री मासळीच्या मेजवानीची जंगी पार्टी करण्यासाठी ताजी मासळी खरेदीसाठी पर्यटकांनी गर्दी केली होती.
यामुळे दापोली, मुरुड, हर्णै रस्त्यावर वाहतूक कोंडी होत होती. ग्रामसुरक्षा दलाचे जवान आणि हर्णै पोलिसांची यामुळे दमछाक झाली. तब्बल दोन वर्षांनी शासकीय बंधनांविरहित असा जल्लोष करायला मिळणार म्हणून बहुसंख्य पर्यटक कोकणात आले होते. तालुक्यातील सर्व रिसॉर्ट, घरगुती न्याहरी निवासाच्या व्यवस्थासह किनारपट्टी हाऊसफुल्ल होती. अनेक रिसॉर्टमध्ये रात्री 12 नंतर नवीन वर्षाच्या स्वागतासाठी डीजे डान्स, मिमिक्री आदी वेगवेगळे कार्यक्रम ठेवण्यात आले होते. संपूर्ण रात्र दापोली ते आंजर्ले, केळशीपर्यंतचा रस्ता जागता होता. रात्रभर वाहनांची वर्दळ चालूच होती. दापोलीतही स्थानिक ग्रामस्थ मज्जा करण्यासाठी मुरुड, पाळंदे, हर्णै, कर्दे, आंजर्ले बीचवर आले होते. कोणताही गैरप्रकार प्रकार घडू नये यासाठी पोलिसांही कडक बंदोबस्त होता.