रेल्वे उड्डाणपूल जोडरस्त्यासाठी भूमोजणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रेल्वे उड्डाणपूल जोडरस्त्यासाठी भूमोजणी
रेल्वे उड्डाणपूल जोडरस्त्यासाठी भूमोजणी

रेल्वे उड्डाणपूल जोडरस्त्यासाठी भूमोजणी

sakal_logo
By

72685
कणकवली ः रेल्वे पुलाच्या जोड रस्त्यासाठी सोमवारपासून जमीन संपादन मोजणीला सुरूवात झाली आहे. (छायाचित्र ः तुषार सावंत)

रेल्वे उड्डाणपूल जोडरस्त्यासाठी भूमोजणी

हळवलचा प्रश्न; ११ वर्षे रखडले काम; ११८ गुंठे क्षेत्रांचे होणार संपादन

सकाळ वृतसेवा
कणकवली, ता. २ ः मागील ११ वर्षे रखडलेल्या कोकण रेल्वेमार्गावरील हळवल उड्डाणपुलाच्या जोडरस्त्यांसाठीच्या भूसंपादनाची प्रकिया आजपासून सुरू झाली आहे. जमीनदार आणि प्रशाकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मशीनच्या सहाय्याने मोजणी सुरू झाली. भूसंपादन आणि तांत्रिक कामे करण्यासाठी सल्लागार आस्थापनाची (कन्सल्टन्सी एजन्सीची) नियुक्ती करण्यासाठी ५ कोटी ४० लाख रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. जोडरस्त्यांच्या कामासाठीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून लवकरच रस्त्याचे काम सुरू होण्याची शक्यता आहे.
कणकवली रेल्वे स्थानकालगत हळवल उड्डाणपूल दोन्ही बाजूंनी जोडला न गेल्याने कणकवली ते हळवल, कसवण, तळवडे, शिवडाव, कळसुली तसेच कुडाळ तालुक्यातील घोटगे, आंब्रड, पोखरण अशा अनेक गावांतील प्रवाशांची गैरसोय होत होती. रेल्वे मार्गावरून धावताना हळवल रेल्वेफाटक अनेकदा बंद असायचे. आता ११ वर्षांनंतर उड्डाणपुलाच्या जोडरस्त्यांसाठी भूसंपादनासह सर्व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण केल्या आहेत. त्यासाठीची निविदा काढून हळवल उड्डाणपूल जोडरस्त्यांसाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू झाली. आज सकाळी रेल्वे मार्गाच्या दोन्ही बाजूच्या १५ पेक्षा अधिक जमीन मालकांना भूसंपादनाच्या नोटीसा देऊन बोलविले होते. या रस्त्यासाठी सुमारे ११८ गुंठे जमीनीची मोजणी करून यातील आवश्यक ती जमीन संपादीत होणार आहे. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहायक कार्यकारी अभियंता के. के. प्रभू, शाखा अभियंता राहुल पवार तसेच भूमीअभिलेख, वनविभागाचे प्रतिनिधी उपस्थिती होते. हळवल सरंपच, पोलिसपाटील यांनाही निमंत्रित केले होते. काही जमीन मालकही मोजणीच्या कामासाठी प्रत्यक्ष हजर होते.
कोकण रेल्वे मार्गावरील हळवल रेल्वेफाटक परिसरात २००९ पासून आंदोलने करण्यात आली. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असणारा अपुरा कर्मचारी आणि अधिकारी वर्गामुळे काम संथगतीने होत होते. त्यातच जमिनीच्या भूसंपादनाचा वाद न्यायप्रविष्ठ होता. अजूनही हा वाद मिटलेला नाही. मात्र, संबंधित जमीन मालकांची या कामाला कोणतीही हरकत नाही. जमिनीचा मोबदला मिळावा, अशी त्यांची मागणी आहे. रखडलेल्या या कामाला गती मिळण्यासाठी ‘कन्सल्टन्सी एजन्सी’ नेमण्यात आली. या मार्गावरील उड्डाणपुलाचे बांधकाम कोकण रेल्वेने २०११ मध्ये पूर्ण केले. त्यानंतर वर्ष २०१५-१६ च्या अर्थसंकल्पात जोडरस्त्यांच्या भूसंपादनासाठी निधी मंजूर करण्यात आला. त्यानंतरच्या काळात आमदार वैभव नाईक यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर वर्ष २०२०-२१ च्या अर्थसंकल्पात सल्लागार आस्थापनाच्या नेमणुकीसाठी ४० लाख रुपये निधीची तरतूद करण्यात आली. या कामासाठी नेमलेल्या समितीच्या माद्यमातून आजपासून जमीन मोजणीच्या कामाला सुरूवात झाली आहे.
---------
चौकट
असे आहे चित्र
रेल्वे फाटकाच्या अलिकडे शंभर ते दोनशे मिटरवरून पुलाकडे जाणारा रस्ता असेल. पुलावरून खाली हलवलच्या दिशेने पुन्हा मुख्य रस्त्याला जोड दिला जाईल. तेथे हळवल, कळसुली शिवडाव येथे जाणाऱ्या रस्त्याला जोडले जाईल तर उजव्याबाजूने कसवण-तळवडे, आंब्रडकडे जाणाऱ्या रस्त्याला पुलाचा रस्ताला जोडला जाणार आहे.