... तर ग्रंथालय परंपरा समृध्द होईल - रेणु दांडेकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

... तर ग्रंथालय परंपरा समृध्द होईल - रेणु दांडेकर
... तर ग्रंथालय परंपरा समृध्द होईल - रेणु दांडेकर

... तर ग्रंथालय परंपरा समृध्द होईल - रेणु दांडेकर

sakal_logo
By

... तर ग्रंथालय परंपरा समृध्द होईल
रेणु दांडेकर ः मालवणमध्ये शतक महोत्सवाची सांगता
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २ : मुले तुमच्या बोलण्यातून नाही तर तुमच्या कृतीतून शिकत असतात. यामुळे पालकांनी आपल्या मुलांसमोर कशा पद्धतीने कृती करावी, हे ठरवायला हवे. मुलांमध्ये वाचन संस्कृती वाढविण्यासाठी आधी पालकांनी वाचनाकडे वळावे. मुलांना त्यांच्या कलेप्रमाणे वाचनाची आवड निर्माण केल्यास भविष्यात ग्रंथालयांची परंपरा अधिकतेने समृद्ध होईल, असे प्रतिपादन दापोली येथील सामाजिक कार्यकर्त्या रेणु दांडेकर यांनी येथे केले.
येथील श्री शिवाजी वाचन मंदिराच्या शतक महोत्सवी वर्ष सांगता सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून त्या बोलत होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन हजारे, संस्थाध्यक्षा मेधा शेवडे, उपाध्यक्ष डॉ. सुभाष दिघे, विश्वस्त अध्यक्ष रुजारिओ पिन्टो उपस्थित होते. याप्रसंगी विश्वस्त प्रमोद ओरसकर, अॅड. समीर गवाणकर, चंद्रशेखर कुशे, कार्यवाह वैदेही जुवाटकर, राधिका कांबळी, अक्षता बांदेकर, जयराम परुळेकर, शैलेश सामंत, हेमा परुळेकर, गजानन मालंडकर, डॉ. अविनाश झाट्ये, बाळासाहेब पंतवालावलकर, श्रीधर काळे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
अध्यक्ष हजारे यांनी शासनस्तरावर ग्रंथालय चळवळ गतिमान होण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेण्यात येत आहेत. सिंधुदुर्गातील ग्रंथालयांना ऐतिहासिक महत्त्व आहे. या ठिकाणी १०० हून अधिक वर्षांची ग्रंथसंपदा आहे. यामुळे ग्रंथालयांनी जास्तीत जास्त वाचकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी नवनवीन उपक्रम राबविण्याची गरज आहे, असे सांगितले. शासन आपल्या स्तरावर कार्यक्रम घेत असताना ग्रंथालयांनीही आता बालवाचकांना वाचनाची आवड निर्माण करावी. शासनाकडून आवश्यक असणारे सर्व सहकार्य केले जाईल. श्री शिवाजी वाचन मंदिराने सामाजिक सेवा कायम सुरू ठेवावी, असे आवाहनही त्यांनी केले.

कोट
कितीही सोशल मीडिया वाढली तरी ग्रंथालय आणि वाचन चळवळ थांबणार नाही. यामध्ये बदल होत जातील, पण वाचक वाचनाकडे वळतच राहणार आहे. वाचनाने जीवन समृद्ध होते. सोशल मीडियावर माहिती मिळते; मात्र संदर्भ हवे असतील तर ते ग्रंथालयातील संग्रहांमध्ये आणि पुस्तकांमध्येच मिळणार आहेत. आपल्याला पडणाऱ्या अनेक प्रश्नांची उत्तरे ग्रंथालयांमध्ये आहेत. श्री शिवाजी वाचन मंदिराचा शतक महोत्सवी वर्ष सांगता सोहळा होत असताना या ठिकाणी सहभागी झाल्याचे समाधान वाटत आहे.
- रेणु दांडेकर