
फोटोसंक्षिप्त-दांडेली-वरचावाडा रस्त्याची डागडुजी
७२७२९
दांडेली-वरचावाडा
रस्त्याची डागडुजी
बांदा ः दांडेली-वरचावाडा रस्त्याकडे लोकप्रतिनिधीसह प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्यामुळे त्याचा नाहक त्रास येथून ये-जा करणाऱ्या ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे. खड्डेमय धोकादायक रस्ता निर्धोक करण्यासाठी वारंवार पाठपुरावा करूनही याकडे कोणाचेही लक्ष जात नसल्याचे सांगत ग्रामस्थांनी श्रमदानातून रस्त्याची डागडुजी केली. प्रशासनाने तात्काळ रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करावे, अशी मागणी दांडेली-वरचावाडा ग्रामस्थांनी केली आहे.
वरचावाडा भाग डोंगराळ असल्याने या ठिकाणी रानटी प्राण्यांचा वावर नेहमी असतो. त्यामुळे मुलांना शाळेत ये-जा करण्यासाठी दुचाकीचा आधार घ्यावा लागत आहे. परंतु, खड्डेमय रस्त्यात अनेक वेळा दुचाकी अडकून अपघातही झाला मात्र प्रशासनाचे याकडे लक्ष गेले नाही. वरचावाडा रस्त्यासाठी प्रशासनाकडे निधी नाही की कशामुळे काम रखडत आहे याचे नेमके कारण काय? असा सवाल ग्रामस्थांनी केला. दरम्यान, ग्रामस्थांच्या एकजुटीने श्रमदानातून केलेली डागडुजी प्रशासनाच्या निदर्शनास येणार काय, असे सांगत संपूर्ण धोकादायक रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करण्याची मागणी दांडेली-वरचावाडा ग्रामस्थांनी केली आहे.
L७२७४४
कबड्डी स्पर्धेत
विलवडे शाळा प्रथम
बांदा, ता. २ ः सावंतवाडी तालुकास्तरीय बाल कला क्रीडा व ज्ञानी मी होणार स्पर्धेत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा विलवडे नं. १ प्रशालेच्या मुलगे मोठा गट सांघिक खेळ कबड्डी या क्रीडा स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त केला. या संघाची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यांच्या या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सोनू दळवी, बांदा केंद्रप्रमुख संदीप गवस, मुख्याध्यापिका सुप्रिया सावंत, शिक्षिका श्रीमती घाडे तसेच उपाध्यक्ष, पालक, विद्यार्थी यांनी अभिनंदन करून स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. क्रीडा शिक्षक मनोहर गवस यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.