
कामे रखडल्याने चौकुळवासीयांचा ठिय्या
72774
सावंतवाडी ः उपवनसंरक्षक कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनास बसलेले चौकुळ ग्रामस्थ. (छायाचित्र ः निखिल माळकर)
कामे रखडल्याने चौकुळवासीयांचा ठिय्या
वन, बांधकामकडे मागण्या; मळववाडी-चूरणीची मूस रस्त्यासह इतर समस्या
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २ ः चौकुळ ग्रामस्थांनी आज येथील वन आणि सार्वजनिक बांधकामच्या कार्यालयांसमोर ठिय्या आंदोलन केले. यावेळी चौकुळ येथील प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजूर असलेल्या मळववाडी ते चूरणीची मुस रस्त्याच्या रखडलेल्या कामांप्रश्नी तसेच त्या भागातील रस्ते पुलाचे काम पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली.
दरम्यान, सार्वजनिक बांधकामचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगौड यांनी या भागातील प्रलंबित रस्त्यांची कामे तातडीने सुरु करण्यात येऊन येत्या पंधरा दिवसात पुलाचे तसेच रस्त्याची कामे पूर्ण करण्यात येतील, असे आश्वासन दिले. उपवनसंरक्षक नवाकिशोर रेड्डी यांनी चौकुळ चूरणीची मुस येथील पाच किलोमीटरपैकी तीन किलोमीटर रस्ता संदर्भात प्रस्ताव पाठवून मागणी करण्यात आली आहे. उद्या (ता.३) त्या ठिकाणी जाऊन सर्व्हे केल्यानंतर ना हरकत दाखला देण्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिले. दोन्ही विभागांनी तसे लेखी आश्वासन दिल्यामुळे आंदोलन स्थगित करण्यात आले.
चौकुळ भागातील बहुतांशी विकासकामे रखडलेली आहेत. चौकुळ येथील मळववाडी तें चूरणीची मुस हे पाच किलोमीटरचे काम प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेमधून मंजूर झाले आहे. या कामाला वर्क ऑर्डर देऊन दोन वर्षे होत आली तरी ते काम सुरु करण्यात आले नाही. शिवाय यातील तीन किलोमीटरचा रस्ता वनखात्याच्या जमिनीतून जात असून त्याला ना हरकत दाखला वनविभागाने दिला नव्हता. चौकुळमधील बेरडकी, चूरणीची मुस येथील रस्ता तसेच या भागातील सतरा किलोमीटर परिसरातील रस्त्याच्या डांबरीकरणाची कामे, येथील भावई मंदीरकडील मंजूर पूल गेली कित्येक वर्षे रखडले आहे. या सर्व प्रश्नी जाब विचारण्यासाठी चौकुळ ग्रामस्थांनी येथील सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच उपवनसंरक्षक कार्यालय येथे ठिय्या आंदोलन पुकारले. यावेळी चौकुळ चूरणीची मुस रस्त्या प्रश्नी उपवनसंरक्षक रेड्डी यांच्याशी ग्रामस्थांनी चर्चा केली. गेल्या दोन वर्षात पीएमजेएसवाय यांच्याकडून आपणास प्रस्ताव आलेला नाही, असे ते म्हणाले. या रस्त्यासाठी वनखात्याची जी जागा जात आहे, त्याचा सर्व्हे उद्या तातडीने करून त्यासाठी लागणारी परवानगी तात्काळ दिली जाईल, असे आश्वासन रेड्डी यांनी दिले. वनवीभागाचे अधिकारी तसेच प्रधानमंत्री ग्रामसडक योजना विभागाचे अधिकारी यांना सोबत घेऊन हा सर्व्हे केला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तसे लेखी आश्वासनानंतर वनविभाग समोरील ठिय्या आंदोलन स्थगित करण्यात आले. या आंदोलनाला भाजपा जिल्हा प्रवक्ते संजू परब, आंबोली उपसरपंच दत्तू नार्वेकर, माजी पंचायत समिती सदस्य संदीप गावडे, पंढरीनाथ राऊळ यांनी भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चा करीत आंदोलनाला पाठिंबा दिला.
दरम्यान, यावेळी सरपंच सरेश शेटवे, माजी सरपंच गुलाबरावं गावडे, बाळा गावडे, संजू गावडे, पांडुरंग गावडे, सुरेश गावडे, बापू गावडे, गंगाराम गावाडे, सुभाष गावडे, संजीव गावडे, संतोष गावडे, दिनेश गावडे, तर चौकुळ चूरणीची मुस व बेरडकी आदी उपस्थित होते. यावेळी पीएमजेएसवायचे कुडाळ येथील अधिकारी, आंबोली वनक्षेत्रपालं विद्या घोडगे, वनकर्मचारी उपस्थित होते. यावेळी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न झाल्यास २६ जानेवारीला मोठे आंदोलन उभारणार असल्याचा इशारा गुलाबराव गावडे यांनी दिला आहे.
--
तीन रस्त्यांची कामे अपूर्णावस्थेत
चौकुळ भागातील सतरा किलोमीटरच्या हद्दीतील मंजूर तीन रस्त्यांची कामे अद्यापही अपूर्णावस्थेत आहेत. त्यातील भावई मंदिरकडील पुलाचे काम ही पूर्ण करण्यात आले नाही. त्याप्रश्नीही ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर आंदोलन केले. यावेळी कार्यकारी अभियंता सार्वगौड यांनी तातडीने चौकुळ येथे ठेकेदार पाठवून रस्त्याच्या एका कामाला सुरुवात केली. उर्वरित रस्ते आणि पुलाचे प्रलंबित कामे येत्या पंधरा दिवसात पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यामुळे येथील आंदोलन देखील स्थगित करण्यात आले.