निकृष्ट कामामुळे करुळवासीय आक्रमक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निकृष्ट कामामुळे करुळवासीय आक्रमक
निकृष्ट कामामुळे करुळवासीय आक्रमक

निकृष्ट कामामुळे करुळवासीय आक्रमक

sakal_logo
By

72793
करूळ ः जामदारवाडी येथे ग्रामस्थांनी खड्डे बुजविण्याचे काम बंद पाडले.

निकृष्ट कामामुळे करुळवासीय आक्रमक

रस्त्याची डागडुजी रोखली; तळेरे-गगनबावडा मार्गावरील आतापर्यंतचे पाचवे आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. २ ः वैभववाडी-गगनबावडा मार्गावरील करूळ-जामदारवाडी येथे सुरू असलेले खड्डे बुजविण्याचे काम संतप्त करूळ ग्रामस्थांनी आज रोखले. निकृष्ट पध्दतीने हे काम सुरू असल्याचा आरोप सरपंच नरेंद्र कोलते यांनी केला. खड्डे बुजविण्याचे काम रोखण्याच्या तळेरे-गगनबावडा मार्गावरील आतापर्यतचा हा पाचवा प्रकार आहे.
तळेरे-गगनबावडा हा महामार्ग मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहतुकीस धोकादायक बनला आहे. करूळ घाटात रस्ताच शिल्लक नसल्याचे चित्र आहे. रस्ता पुर्णतः उखडला आहे. रस्त्यावर खडी अस्ताव्यस्त दिसून येत आहे. त्यामुळे या मार्गावर नाममात्र अवजड वाहतुक सुरू आहे. वैभववाडी-करूळ मार्गाची अवस्था देखील अतिशय बिकट आहे. या मार्गावरील करूळ-जामदारवाडी येथे मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत. येथील खड्डे बुजविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. हे खड्डे खडी, डांबराने बुजविण्यापूर्वी त्या खड्ड्यांमधील मुरूम, माती बाहेर काढणे आवश्यक असते. परंतु, ते न करताच आज खड्डे बुजविण्याचे काम सुरू असल्याचे करूळ ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. याशिवाय खडी, डांबर पसरविण्यापुर्वी डांबर न टाकताच खडी पसरवली जात होती. ही माहिती ग्रामस्थांनी सरपंच नरेंद्र कोलते यांना दिल्यानंतर आज सकाळी अकरा वाजता जामदारवाडी येथे ग्रामस्थ एकत्र झाले. त्यांनी खड्डे बुजविण्याचे काम रोखले. कोणत्याही परिस्थितीत निकृष्ट काम होऊ देणार नाही, असा इशारा ग्रामस्थांनी दिला. ठेकेदाराने खड्ड्यांमध्ये टाकलेली खडी बाहेर काढली. डांबर टाकूनच त्यावर खडी पसरावी, अन्यथा काम करू नये, या भुमिकेनंतर ठेकेदाराने ग्रामस्थांच्या मागणीनुसार काम सुरू केले. यावेळी माजी पंचायत समिती बाळा कदम, रमेश पांचाळ, भास्कर सावंत आदी उपस्थित होते.
-----------
चौकट
सरपंचांची कठोर भूमिका
यावेळी सरपंच कोलते यांनी देखील ठाम भुमिका घेतली. करूळच्या हद्दीत निकृष्ट काम अजिबात खपवून घेणार नाही. शासनाच्या निधीचा योग्य वापर झाला पाहिजे, असे त्यांनी अधिकारी आणि ठेकेदाराला ठणकावून सांगितले.