
नोकरी सोडून बिस्कीट उद्योगात भरारी
72925
मालवण ः कट्टा येथे बिस्किट उद्योगाची निर्मिती करणारे उद्योजक संदेश गरड.
72931
मालवण ः गरड यांच्या शिवमल्हार उद्योगात तयार झालेली बिस्किटे.
नोकरी सोडून बिस्कीट उद्योगात भरारी
कट्टा येथील तरूण ः शेकडो तरूणांना उपलब्ध केला रोजगार
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. ३ ः मेकॅनिकल इंजिनियर झाल्यानंतर गोवा राज्यात चांगल्या पगारावर असलेल्या तरूणाने नोकरी सोडून बिस्किट उद्योगामध्ये भरारी घेतली आहे. वर्षाला ४० लाखाची उलाढाल असलेल्या उद्योगात १०० तरूणांना रोजगाराचीही संधी उपलब्ध झाली आहे. संदेश गरड (रा. मालवण, कट्टा), असे या तरुणाचे नाव आहे.
कट्टा येथील गरड यांचे आई आणि वडील गोव्यात नोकरीला असल्याने प्राथमिक ते अभियांत्रिकीपर्यंतचे सर्व शिक्षण गोव्यातच झाले. अभियांत्रिकी केल्यानंतर गोव्यातील नामांकित कंपनीत नोकरीही लागली. दरम्यान, वडिलांचे निधन झाले आणि आई देखील कट्टा-मालवण या गावी आली. त्यामुळे संदेश यांना गावची ओढ स्वस्थ बसू देत नव्हती. त्याचबरोबर नोकरीपेक्षा स्वत: काहीतरी उद्योग करण्याची जिद्द स्वस्थ बसू देत नव्हती. या उर्मीतूनच त्यांनी चांगल्या पगाराची नोकरी सोडून कट्टा येथे बिस्किट निर्मितीचा उद्योग सुरू केला. पदवीपर्यंतचे शिक्षण घेत असताना त्यांचे आई-वडील दिवसभर नोकरीसाठी बाहेर असल्याने संदेश यांना घरातच विविध प्रकारचे खाद्यपदार्थ तयार करण्याची आवड निर्माण झाली होती. हीच आवड उद्योगामध्ये त्यांनी परावर्तीत केली.
---
शेवया निर्मितीतून बिस्किटांकडे
सुरवातीला त्यांनी कट्टा येथे जागा भाड्याने घेऊन विविध फ्लेव्हरमध्ये शेवया तयार करून त्याची विक्री सुरू केली. यात जम बसल्यानंतर त्यांनी मैद्याऐवजी नाचणी, गहू, बाजरी आदींपासून आरोग्यदायी बिस्किट निर्मितीकडे मोर्चा वळवला. या बिस्किटांना मुंबई, पुणे, गोवा या भागात मोठी मागणी असल्याचे लक्षात आले. यानंतर त्यांनी आजरा जनता सहकारी बँकेकडून कर्ज घेऊन बिस्किट तयार करण्याची यंत्रसामग्री आणून २०२० मध्ये स्वत:चा ‘शिवमल्हार होम प्रॉडक्ट’ नावाचा उद्योग सुरू केला. मागील तीन वर्षात तब्बल ४० लाख रूपयांची वार्षिक उलाढाल या उद्योगाने केली असून १०० जणांना रोजगारही मिळवून दिला आहे.
---
पॉईंटर
उद्योगावर एक नजर
- बिस्किटात सेंद्रीय गुळाचा वापर
- थेट शेतकऱ्यांकडूनच नाचणी, बाजरीची खरेदी
- मुंबई, पुणेकरांकडून बिस्कीटांना मागणी
- मधुमेही रूग्णांसाठी जांभूळ पावडरपासून शुगर फ्री बिस्किट
- हेल्दी बिस्किटांना महाराष्ट्रसह गोव्यात मागणी
- लस्सी, दही आदींमध्येही उत्पादन
- ‘शिवमल्हार’तर्फे रोजगार देण्यासाठी प्रयत्न
----------
कोट
नोकरीत अडकून पडण्यापेक्षा स्वत:चा उद्योग उभारून त्यात अनेकांना रोजगार मिळवून द्यायचा असे धेय्य होते. शंभर तरूण माझ्या उद्योगामध्ये काम करतात. इच्छाशक्ती, मेहनत आणि नियोजनाच्या आधारे निश्चितपणे यश मिळविता येते. उद्योगाचे स्वप्न पूर्ण करताना अनेकांने सहकार्य मिळाले.
- संदेश गरड, तरूण उद्योजक