विजयदुर्ग पायथ्याशी पवारांविरोधात घोषणा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विजयदुर्ग पायथ्याशी पवारांविरोधात घोषणा
विजयदुर्ग पायथ्याशी पवारांविरोधात घोषणा

विजयदुर्ग पायथ्याशी पवारांविरोधात घोषणा

sakal_logo
By

73036
विजयदुर्ग ः येथील किल्याच्या पायथ्याशी भाजप आमदार नीतेश राणे यांच्या उपस्थितीत प्रतिकात्मक पुतळ्याचे कडेलोट आंदोलन झाले.

73038
विजयदुर्ग ः येथील किल्यावर भाजप आमदार नीतेश राणे जात असताना. (छायाचित्रे ः संतोष कुळकर्णी)


विजयदुर्ग पायथ्याशी पवारांविरोधात घोषणा

‘त्या’ कथित वक्तव्याचा भाजपकडून निषेध; कडेलोट आंदोलनाचा प्रयत्न फसला

सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. ३ ः राज्याचे विरोधी पक्षनेते तथा राष्ट्रवादी पक्षाचे नेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या कथित वक्त्यव्याच्या निषेधार्थ भाजप आमदार नीतेश राणे यांच्या उपस्थितीत किल्ले विजयदुर्गच्या पायथ्याशी प्रतिकात्मक पुतळ्यांचे कडेलोट आंदोलन झाले. खरंतर किल्ले विजयदुर्गच्या बुरूजावरूनच कडेलोट आंदोलन छेडण्याचा भाजपचा गनिमी कावा पोलिसांच्या वेळीच हस्तक्षेपामुळे फसला; मात्र तरीही घोषणाबाजी करीत पायथ्याशी आंदोलन करून भाजपने डाव साधला.
राज्याचे विरोधी पक्षनेते तथा राष्ट्रवादीचे नेते पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या कथित वक्त्यव्याचा हवाला देत येथील भाजप आक्रमक झाली. त्यांनी आमदार नीतेश राणे यांच्या उपस्थितीत श्री. पवार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचा किल्ले विजयदुर्गवरून कडेलोट करण्याचा मनसुबा रचला. किल्ले विजयदुर्गवर भाजपकडून आंदोलन छेडले जाणार असल्याची पोलिसांना आधीच कुणकुण लागली असल्याने विभागीय पोलिस अधिकारी विनोद कांबळे यांच्यासह मोठा पोलिस फौजफाटा तैनात होता. आमदार राणे यांचे आगमन होताच सर्वजण घोषणाबाजी करीत किल्ले विजयर्दुवर पोचले. आधीच नियोजन ठरल्यानुसार गनिमी कावा करीत श्री. पवार यांचा प्रतिकात्मक पुतळा किल्यावर आणल्याची माहिती पोलिसांना कळताच त्यांनी हस्तक्षेप करीत पुतळा ताब्यात घेतला. त्यामुळे किल्ले विजयदुर्गच्या बुरूजावरून कडेलोट करण्याचा भाजपचा प्रयत्न फसला. यावेळी पोलिसांच्या कृतीबाबत भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजीची भावना पसरली. ‘पुतळा परत द्या, आम्ही किल्याच्या बाहेर आंदोलन करतो’, अशी भूमिका आमदार राणे यांच्यासह कार्यकर्त्यांनी घेत पोलिसांना पुतळा परत देण्याची विनंती केली; मात्र पोलिसांनी पुतळा देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी दुसरा पुतळा बनवण्याचा निर्णय घेतला. अखेर किल्ले विजयदुर्गवर आंदोलन छेडण्याचा विचार बदलत आमदार राणे यांच्यासह कार्यकर्त्यांनी किल्याच्या पायथ्याशी असलेल्या खाडीकिनारी जेटीवरून श्री. पवार आणि राष्ट्रवादीचे नेते आव्हाड यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचा कडेलोट केला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांचा जयघोष करण्यात आला. तर पवार आणि आव्हाड यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी आमदार श्री. राणे यांच्यासह भाजप जिल्हा उपाध्यक्ष बाळ खडपे, आरिफ बगदादी, संदीप साटम, तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर, नासिर मुकादम, नगरसेविका प्रणाली माने, नगरसेविका तन्वी चांदोस्कर, उषःकला केळुसकर, शैलेश लोके, संजय तारकर आदी उपस्थित होते.
...........
कोट
छत्रपती संभाजी महाराज ‘धर्मवीर’ नव्हते, असे अजित पवार यांनी केलेले वक्तव्य चूकीचे होते. जितेंद्र आव्हाड यांनीही औरंगजेबवर प्रेम दाखवणारे वक्तव्य केले होते. त्यामुळे कडेलोट आंदोलन छेडण्यात आले. अजित पवार यांनी कोणाचे तरी स्क्रिफ्ट वाचणे उपयोगाचे नाही. यातून श्री. पवार यांनी बोध घेऊन चुकीची माहिती बाहेर देऊ नये. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज कधीच कळणार नाही. इतिहासाचे पुरावे मागणार्‍यांकडून कोणती अपेक्षा ठेवावी. त्यांना त्यांच्याविषयी प्रेम, आस्था नसल्याने त्यांचे खरे चेहरे जनतेने ओळखावे.
- नीतेश राणे, आमदार, भाजप