देवी भगवती जत्रोत्सवाची तयारी युध्दपातळीवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देवी भगवती जत्रोत्सवाची तयारी युध्दपातळीवर
देवी भगवती जत्रोत्सवाची तयारी युध्दपातळीवर

देवी भगवती जत्रोत्सवाची तयारी युध्दपातळीवर

sakal_logo
By

७३२४५


देवी भगवतीची उद्यापासून जत्रा

मुणगेतील सोहळ्याची तयारी युद्धपातळीवर

सकाळ वृत्तसेवा
मुणगे, ता. ४ ः येथील ग्रामदेवता देवी भगवतीच्या जत्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. देवस्थान कमिटीने चोख नियोजन केले असून जत्रोत्सवाला येणाऱ्या व्यापारी वर्गास दुकानासाठी जागा, खासगी वाहनांना पार्किंग व्यवस्था, भाविकांना देवीचे दर्शन लवकरात लवकर मिळणे या बाबींचे चोख नियोजन केले आहे.
देवगड तालुक्यातील प्रसिद्ध देवस्थान देवी भगवतीचा वार्षिक जत्रोत्सव ६ ते १० जानेवारी या कालावधीत साजरा होणार आहे. या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन देवी भगवती देवस्थान मुणगेच्यावतीने केले आहे.
मंदिराच्या आवारातील मंडपात सजावट मंदिराच्या समोरील कमानी व कमानी समोरील मंडप, रस्त्या नजीकची कमान आदी सजावट पूर्ण झाली असून मंदीर व मंदिर परिसरामध्ये आकर्षक विद्युत रोषणाई करण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. मंदिराच्या आवारात व मंदिराबाहेर मालवणी खाजा, खेळण्यांची दुकाने, कपड्यांची दुकाने, हाँटेल्स आदी दुकाने थाटण्यास सुरुवात झाली आहे. शुक्रवारी (ता.६) सकाळी देवीच्या मुर्तीस विधीवत स्नान घालून नवीन वस्त्रालंकार, त्यानंतर देवीच्या मूर्तीस दागदागिने, देवीची गावघराची ओटी भरण्यात येईल व गावघराचे गाऱ्हाणे घालण्यात येणार आहे. त्यानंतर भाविकांना देवीचे दर्शन व ओटी भरण्यासाठी सुरूवात होईल. दिवसभरामध्ये गावातील वाडीमधील भजन मंडळांची भजने व संगीत कार्यक्रम होतील. सायंकाळी गोंधळी गायन, नौबती वाजन, रात्री आठ वाजल्यापासून बाहेर गावातील भजने, अकरा वाजता प्रवचन व पुराण वाचन, त्यानंतर देवीच्या पालखीची मिरवणूक, त्यानंतर गोंधळी गायन व नंतर सुश्राव्य किर्तन झाल्यानंतर त्या दिवसाचा कार्यक्रम पूर्ण होईल. देवीला मागील वर्षी केलेले नवस फेडणे व नवीन नवस बोलणे आदी व्यवस्था देवस्थान कार्यालयामध्ये करण्यात आली आहे. भाविकांना लवकरात लवकर देवीचे दर्शन व ओटी भरण्यास मिळण्यासाठी वाडीवाडीतील स्वयंसेवक नेमण्यात आले आहेत. पाच दिवस साजऱ्या होणाऱ्या या जत्रोत्सवाची सांगता १० जानेवारीला उत्तर रात्रीनंतर लळीताचे कार्यक्रमाने होईल.