
रत्नागिरी ः फाटक हायस्कूलमध्ये रंगला ’आनंद बाजार’
rat४p२९.jpg-
७३२४०
रत्नागिरीः शहरातील फाटक प्रशालेत खरेदी-विक्रीचा आनंद घेताना विद्यार्थी.
--------
फाटक हायस्कूलमध्ये रंगला ‘आनंद बाजार’
विद्यार्थी बनले विक्रेते अन् ग्राहक; अन्नपदार्थासह कलाकुसरीच्या वस्तू
रत्नागिरी, ता. ४ः कुणी भाजीपाला विक्रीसाठी आणला होता तर कुणी खाद्यपदार्थ. कुणी कोकणी मेवा तर कुणी चक्क माशांसह येथील वेगवेगळे वैशिष्ट्यपूर्ण पदार्थ, वस्तू विक्रीसाठी मांडल्या होत्या. विक्रेतेही विद्यार्थी आणि ग्राहकही विद्यार्थीच होते. अगदी इमिटेशन ज्वेलरीपासून जीवनावश्यक असणाऱ्या अनेक वस्तू विद्यार्थ्यांनी स्टॉलमध्ये मांडल्या आणि खरेदी-विक्रीच्या उत्साहाचा ‘आनंद बाजार’ रंगला तो रत्नागिरीच्या फाटक हायस्कूल प्रशालेत.
विद्यार्थी, पालक, शिक्षकांनी या विद्यार्थ्यांच्या स्टॉलवरील वस्तू खरेदी केल्या आणि या स्टॉलवाल्या विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित झाला. रत्नागिरी शहरातील फाटक हायस्कूलमध्ये स्वस्त आणि मस्त आनंद बाजार हा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमाचे उद्घाटन मुख्याध्यापक किशोर लेले, उपमुख्याध्यापक पाटणकर, पर्यवेक्षक झोरे व सर्व शिक्षक यांच्या उपस्थितीत झाले. विद्यार्थ्यांना शालेय स्तरावर व्यावहारिक ज्ञान प्रत्यक्ष अनुभवता यावे, नफा-तोटासारख्या गणिती संकल्पना स्पष्ट व्हाव्यात, स्वकमाई व स्वयंरोजगार याचे संस्कार व्हावेत, श्रमाचे महत्व शालेय वयातच कळावे, कष्ट करण्याची तयारी शालेय वयातच निर्माण व्हावी या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला.
या उपक्रमाचे हे सातवे वर्ष असल्याची माहिती शिक्षक प्रकाश देवरूखकर यांनी या वेळी उपस्थितांना दिली. सुमारे १२० ते १५० विद्यार्थ्यांनी या वेळी स्टॉल लावले होते. कोकणची खास ओळख असणारे खाद्यपदार्थ, कोकणातील पिकांपासून बनलेली पिठे, विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेले अन्नपदार्थ, विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या कलाकुसरीच्या वस्तू या आनंद बाजारात लक्षवेधी ठरल्या. या आनंद बाजारातून आम्हाला खूप काही शिकायला मिळाले, अशा प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी या वेळी दिल्या. पालकांनीही हे स्टॉल लावण्यासाठी मेहनत घेतली. त्यांनीही या उपक्रमात उत्साहाने सहभाग घेत या उपक्रमाचे कौतुक केले. शाळेतील शिक्षकांनी हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी सहकार्य केले.