
कणकवलीत आजपासून पर्यटन महोत्सव
कणकवलीत आजपासून पर्यटन महोत्सव
पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार उद्घाटन; रविवारपर्यंत रंगणार सांस्कृतिक कार्यक्रम
कणकवली, ता.४ : शहरातील उपजिल्हा रूग्णालया समोरील पटांगणात कणकवली पर्यटन महोत्सव २०२३ ला उद्यापासून (ता.५) प्रारंभ होत आहे. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याहस्ते या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर रविवार (ता.८) पर्यंत विविध दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत सांस्कृतिक कार्यक्रम रंगणार आहेत.
पर्यटन महोत्सवाच्या प्रारंभी उद्या (ता.५) सायंकाळी चारला शहरातील सर्व १७ प्रभागांमधून पर्यटन महोत्सव स्थळापर्यंत चित्ररथ दाखल होणार आहेत. या चित्ररथांसह ढोलपथक आणि विविध देखाव्यांसह बाजारपेठेतून शोभायात्रा निघणार आहे. शोभायात्रा महोत्सवस्थळी दाखल झाल्यानंतर विविध खाद्यपदार्थांची रेलचेल असणाऱ्या फुड फेस्टिव्हलचे उद्घाटन होईल. त्यानंतर सायंकाळी सातला पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे.
यावेळी माजी खासदार नीलेश राणे, आमदार नीतेश राणे, माजी आमदार प्रमोद जठार, जि. प. माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी. उपाध्यक्ष अतुल काळसेकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. उद्घाटन कार्यक्रमानंतर ‘बेधुंद धमाल कॉमेडी शो’ आणि ‘ऑर्केस्टा’ होणार आहे. यामध्ये मराठीतील आघाडीचे विनोदवीर प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, श्यामसुंदर राजपूत, चेतना भट, गायक कविता राम, अमृता नातू फेम विश्वजीत बोरगावकर यांच्या सुपरहीट कलेचा आनंद लुटता येणार आहे. या कार्यक्रमाचे निवेदन ऐश्वर्या धूपकर करणार आहे.
--
कार्यक्रमांवर एक नजर
शुक्रवार ६ जानेवारी रोजी रात्री ८ वाजता सुहास वरुणकर, हरिभाऊ भिसे, संजय मालंडकर यांच्या संकल्पनेतून स्थानिक कलाकारांचा ‘कनकसंध्या कलाविष्कार’ हा कार्यक्रम होणार आहे. शनिवारी (ता. ७) सायंकाळी साडेसातला भाई साटम आणि ५० सहकाऱ्यांचा ‘मनी आहे भाव, देवा मला पाव’ हा आध्यात्मिक आणि विनोदी कार्यक्रम. तर रात्री आठला सेलिब्रेटी कलाकारांचा जल्लोष व नृत्य, गायनाचा कार्यक्रम होणार आहे. यामध्ये पार्श्वगायिका वैशाली माडे, स्वप्नील गोडबोले, इंडियन आयडॉल फेम सायली कांबळे यांच्या गायनासोबतच हेमलता बाणे, लावणीसम्राज्ञी विजया कदम यांचे नृत्य होणार आहे. याचे सूत्रसंचालन प्रसिद्ध कलाकार दिगंबर नाईक व हेमांगी कवी करणार आहेत.
--
रविवारी महोत्सवाचा समारोप
महोत्सवाचा समारोप रविवारी (ता.८) होईल. यावेळी केंद्रीयमंत्री नारायण राणे, आमदार नीतेश राणे, माजी आमदार प्रमोद जठार, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी आदी उपस्थित राहणार आहेत. तर रात्री आठला ख्यातनाम गायक, गायन कार्यक्रमांचे परीक्षण करणारे जावेद अली लाईव्ह यांचा ‘तेरी झलक..’ हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष गणेश उर्फ बंडू हर्ण तसेच सर्व नगरपंचायत सदस्यांनी केले आहे.