टाकाऊ करवंटीतून शोधला रोजगार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टाकाऊ करवंटीतून शोधला रोजगार
टाकाऊ करवंटीतून शोधला रोजगार

टाकाऊ करवंटीतून शोधला रोजगार

sakal_logo
By

swt53.jpg
73403
मालवणः करवंटीपासून वस्तू साकारताना भूषण मेतर.

swt54 ते swt57.jpg
73404, 73405, 73407, 73406
मालवणः करवंटीपासून बनविलेल्या विविध वस्तू.

टाकाऊ करवंटीतून शोधला रोजगार
भूषण मेतरची यशोगाथाः कलाविष्काराला मिळतेय पसंती
प्रशांत हिंदळेकरः सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ५ः निसर्गाने आपल्याला भरभरून दिले आहे. या साधनसंपत्तीचा योग्य वापर केल्यास त्यातून चांगले अर्थार्जनही मिळू शकते यासाठी जिद्द, मेहनतीची जोड आवश्यक आहे, हे येथील तरूण कलाकार भूषण मेतर याने दाखवून दिले आहे. टाकाऊ करवंटीपासून त्याने बनविलेल्या विविध वस्तू आज सर्वांचेच आकर्षण ठरले आहे. करवंटीपासून वस्तू बनविण्याच्या या कलेचे उद्योगाच्या दृष्टीने त्याचे पुढे पाऊल पडत आहे.
कोकण भूमी ही समृद्ध असून नारळाच्या झाडांनी बहरलेली आहे. माड म्हणजे असे झाड ज्याच्या प्रत्येक घटकाचा मानवाला उपयोग होतो. नारळाच्या खोबर्‍याचा जेवणात वापर केला जातो. तसेच माडाच्या झावळांचा शाकारणीसाठी, त्यातील हिरकांपासून झाडू, माडाच्या खोडाचे वासे काढून ते छप्पर बांधणीसाठी वापरले जातात. जळावासाठी देखील माडाची झावळे, खोड, पिडे, नारळाची सोडणे आदी वापरले जातात. नारळ फोडल्यावर त्यातील खोबरे वापरून झाल्यावर त्याचे राहिलेले कवच म्हणजेच करवंटी टाकून दिली जाते किंवा सर्रासपणे जळावासाठी वापरली जाते; मात्र याच टाकाऊ करवंटीपासून अनेक शोभिवंत व वापरायोग्य वस्तू देखील बनवता येतात. दक्षिण आशियातील काही देशांमध्ये तसेच भारतातील दक्षिणेकडील केरळ व इतर राज्यांत करवंटीपासून वस्तू बनविल्या जातात. अशा वस्तूंना मोठी मागणीही असते; मात्र आपले कोकण नारळाच्या झाडांनी सदासंपन्न असताना करवंट्या म्हणाव्या तशा उपयोगात आणल्या जात नाहीत. आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भूषण मेतर यांच्यासह काही मोजके कलाकार करवंटीमधील उद्योजकता शोधत आहेत.
दिवाळीमध्ये विविध टाकाऊ वस्तूंपासून आकर्षक कंदीलही ते साकारत आहेत. यात प्लास्टिक बॉटल, रंगांचे डबे, प्लास्टिक व कागदी ग्लास, माचिस बॉक्स आदीपासून त्यांनी कंदील बनविले आहेत. लहानपणी नारळाच्या करवंटीचे मुखवटे बनविण्याचा त्यांना छंद होता. कोरोना महामारीच्या लॉकडाऊन काळात मेतर यांनी या जुन्या छंदाला पुन्हा जोपासताना करवंटीपासून आणखी काय बनविता येईल, या विचारमंथनात घरातील उपलब्ध साधनांपासून करवंटी पॉलिश करून तसेच ती कापून त्यापासून फ्लॉवर शोपीस बनविला. टाकाऊ करवंटीपासून बनलेली ही कलाकृती सर्वांनाच आवडल्याने त्यातून प्रेरणा घेत त्यांनी करवंटीपासून इतर काही वस्तू बनवून पाहिल्या. करवंटी साफ करणे, ती पॉलिश करणे, कटिंग करणे ही सर्व मेहनतीची कामे असल्याने भूषण यांनी काही मशीनचा आधार घेत विविध वस्तू बनविल्या.
गेली तीन वर्षे मेतर हे करवंटीपासून विविध वस्तू साकारत आहेत. यात करवंटीपासून वापरायोग्य असे कप, बाउल, आईस्क्रीम कप, चमचे, डाऊल, अगरबत्ती स्टँड, निरांजन, पेन होल्डर, इअर रिंग अशा वस्तू साकारल्या. तर फ्लॉवर पॉट, फ्लॉवर शोपीस, ख्रिसमस ट्री, उंदीर, घर, माड, कासव आदी विविध शोभिवंत वस्तूही त्यांनी बनविल्या आहेत. करवंटीच्या वस्तू पर्यावरणपूरकही ठरतात. आपल्या दैनंदिन वापराच्या प्लास्टिकच्या कप, चमचे, बाउल, डाऊल या वस्तूंना करवंटीच्या वस्तू एक पर्यावरणपूरक पर्यायही ठरू शकतात. करवंटीपासून वस्तू बनविण्याच्या प्रक्रियेसाठी करवंटीचा साठा आणि काही आवश्यक हत्यारे व मशीन असे भांडवल लागते. कमी भांडवलात हा उद्योग सुरू करता येऊ शकतो.

चौकट
नव्या उद्योजकांना प्रोत्साहन देण्याची गरज
मेतर यांच्याप्रमाणेच मूळ सावंतवाडीचे आणि सध्या येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत असणारे प्रा. हसन खान यांनीही कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या साहाय्याने करवंटीपासून राख्या, दिवाळीसाठी करवंटीचे कंदील, दिवे बनविले होते. तसेच वेंगुर्ले तालुक्यातील परुळे येथील प्रथमेश नाईक हे देखील उद्योजक गेली काही वर्षे करवंटीपासून व सुपारीच्या पानापासून वस्तू बनवित आहेत. अणाव-दाभाचीवाडी येथील प्रदीप पावसकर हे देखील करवंटीपासून वस्तू बनविण्याच्या उद्योगात कार्यरत आहेत. आज जिल्ह्यात करवंटीपासून वस्तू बनविण्याच्या कलेद्वारे स्थानिक नागरिक उद्योजकतेच्या दृष्टीने पाऊल टाकत आहेत. यातील उद्योजकीय संधींसाठी शासनाने देखील पाठबळ देऊन नवीन उद्योजकांना प्रोत्साहन देणे महत्त्वाचे बनले आहे.

कोट
करवंटीपासून बनविलेल्या वस्तू स्थानिक नागरिकांसह पर्यटकांच्याही पसंतीला उतरत असून यातून चांगले उत्पन्नही मिळत आहे. ‘शालिनी कोकोनट शेल आर्ट’ या नावाने या वस्तू सादर केल्या आहेत. या वस्तू अनोख्या असल्याने त्या खरेदी करणारा वर्गही वेगळा असा आहे. व्हॉट्सअप, फेसबुक, इन्स्टाग्राम आदी माध्यमांद्वारे या वस्तूंची मी जाहिरात करतो. ऑर्डरप्रमाणेही वस्तू तयार करून देण्यात येतात. स्टॉल व होम स्टे आदी ठिकाणी या वस्तू विक्रीसाठी ठेवल्या जात आहेत. मालवणात येणारे पर्यटकही या वस्तूंकडे आकर्षित होत असून पर्यटक हेच या वस्तूंसाठी मोठी बाजारपेठ ठरू शकतात. त्यादृष्टीने प्रयत्न सुरु आहेत.
- भूषण मेतर, कलाकार