
संक्षिप्त
चिपळुणात आजपासून
कबड्डीचा थरार
चिपळूण ः शहरातील पाग गोरिवलेवाडीतर्फे ६ ते ८ जानेवारीदरम्यान भव्य आमदार चषक जिल्हास्तरीय पुरुष व महिला खुला गट कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सुधीरशेठ शिंदे क्रीडानगरी येथे तीन दिवस सायंकाळी ६ ते रात्री ११ वाजेपर्यंत या स्पर्धांचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी राज्यमंत्री आदितीताई तटकरे, शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार भास्कर जाधव, आमदार शेखर निकम, माजी आमदार रमेशभाई कदम, माजी आमदार सदानंद चव्हाण, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सचिन कदम, प्रताप शिंदे, सुधीर शिंदे, प्रशांत यादव, नितीन ठसाळे, प्रकाश सावंत, उमेश सकपाळ, मंगेश तांबे, भाऊशेठ कानडे आदी उपस्थित राहणार आहेत.
एमआयबी गर्ल्स हायस्कूलचे शिष्यवृत्तीत यश
गावतळे ः खेड शहरातील बज्म-ए-इमदादीया संचलित एम. आय. बी. गर्ल्स हायस्कूल अॅण्ड ज्युनि. कॉलेजच्या तीन विद्यार्थिनींनी ५वी व ८वी शिष्यवृत्ती परीक्षा २०२२मध्ये शहरी भागातील गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त केले आहे. ८वीतून उल्फत विलायत अली मुकादम (३१), बुशरा सईदुर रहमान सिद्दिकी (५८) आणि ५वीतून आलिया तुफैल महाडीक (११०) क्रमांक मिळवून गुणवत्ता यादीत येण्याचा मान मिळवला. सर्व यशस्वी विद्यार्थिनी व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थाध्यक्ष ए. आर. डी. खतीब, सर्व संस्थासदस्य, मुख्याध्यापक शहाबुद्दीन परकार, एम. आय. एच्या मुख्याध्यापिका इश्रत नाडकर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थिनींनी अभिनंदन केले आहे.
दापोलीतील सात विद्यार्थ्यांना ब्लॅक बेल्ट
दाभोळ ः कोल्हापूर येथे झालेल्या बेल्ट ग्रेडेशन परीक्षेत दापोलीतील सात विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट प्रात्यक्षिक करत ब्लॅक बेल्ट मिळवला. ही परीक्षा शोतोकान कराटे फेडरेशन ऑफ इंडियातर्फे घेण्यात आली होती. परीक्षक म्हणून राजेश ठाकूर यांनी काम पाहिले. सौम्या आंजर्लेकर, गार्गी केळकर, उत्कर्षा पाटील, अर्णव गोफणे, नावीन्या सोनवाडकर, आर्या जवळगे, आर्यन पवार यांनी विशेष प्राविण्यासह ब्लॅक बेल्ट मिळवला असून, या विद्यार्थ्यांना सुरेंद्र शिंदे यांनी मार्गदर्शन केले.