
रहाटाघर बसस्थानकाची दशा कायम
rat०६३.txt
(पान ३ साठी)
रहाटाघर बसस्थानकाची दुर्दशा कायम
स्वच्छतागृहाचे पाणी रस्त्यावर ; धुरळा, रस्त्याची दुरवस्था
रत्नागिरी, ता. ६ ः शहरातील रहाटाघर बसस्थानकाच्या येण्या-जाण्याच्या रस्त्याची दुरवस्था कायम आहे. त्यात स्वच्छतागृहाचे पाणी रस्त्यावर आल्याने परिसरात दुर्गंधी पसरत आहे; मात्र याकडे एसटी प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे. यामध्ये कोणतीही सुधारणा न झाल्याने हे बसस्थानक बदनाम होत असून प्रवाशांकडून नाराजी व्यक्त होत आहे. पालकमंत्री उदय सामंत यांच्या अचानक भेटीनेही एसटी प्रशासनावर फारसा परिणाम नाही.
रत्नागिरी बसस्थानकाचे काम रखडल्याने ग्रामीण बससेवा रहाटाघर येथून सुरू आहे; मात्र रहाटाघर बसस्थानकाच्या दुरवस्थेमुळे प्रवाशांची परवड सुरूच आहे. रहाटाघर बसस्थानक परिसरातील स्वच्छतागृहाचे पाईप फुटून पाणी रस्त्यावर येत आहे. त्यामुळे परिसरातील प्रवाशांसह नागरिकांनाही याचा त्रास होत आहे; मात्र अनेक दिवस एसटी प्रशासन याकडे कानाडोळा करत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
रहाटाघर बसस्थानक परिसर व स्वच्छतागृहाचा पुरता बोजवारा उडाला आहे. परिसरात खड्डे पडले आहेत. यामुळे रहाटाघर स्थानकात जाण्यापेक्षा प्रवासी जुन्या बसस्थानकासमोरील रस्त्यावर बससाठी उभे राहणे पसंत करत असल्याचे चित्र आहे. पालकमंत्री उदय सामंत यांनी अचानक भेट देऊन काही सुधारणा करून घेतल्या असल्या तरी त्या पुरेशा नाहीत. बसस्थानकात गाड्या लागल्यानंतर प्रचंड धुरळा उडून प्रवाशांना त्याचा त्रास होत आहे. त्यामुळे त्या भागाचे डांबरीकरण करणे आवश्यक असल्याची मागणी प्रवाशांनी केली आहे. एसटी बसस्थानकात शिरताना पडलेल्या खड्ड्यांमध्ये चिरे टाकल्याने बुजवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे त्याला लेव्हल नाही. बाहेर पडणाऱ्या रस्त्याचीही तीच अवस्था आहे. एसटी प्रशासन प्रवाशांना चांगल्या पायाभूत सुविधा कधी देणार, असा सवाल प्रवाशी करत आहेत.