पान एक-दोन चोरीच्या बातम्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पान एक-दोन चोरीच्या बातम्या
पान एक-दोन चोरीच्या बातम्या

पान एक-दोन चोरीच्या बातम्या

sakal_logo
By

७३७४६

मळेवाडमध्ये बंद बंगला फोडला
दीड लाख रोकड पळविली; चोरटे सीसीटीव्हीत कैद
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ६ ः तालुक्यातील मळेवाड माळकर टेंब येथील बंद बंगला फोडून चोरट्यांनी चोरी केली आहे. यात त्यांनी दीड लाखाची रोकड लंपास केली व मोडतोड करून नुकसान केले. या प्रकरणी देखरेखदार राघोबा मधुसूदन माळकर (वय ४८) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार चोरट्यांविरोधात येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. दोघेही चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, संबंधित बंगला अभय नारायण सोनुर्लेकर यांच्या मालकीचा आहे. ते मुंबई येथे वास्तव्याला असतात. २८ डिसेंबरला ते गावी आले होते व ३ जानेवारीला ते मुंबईत परतले. त्यांच्या बंगल्याच्या देखरेखीसाठी असलेले माळकर हे काल (ता. ५) सायंकाळी बंगला बंद करून घरी परतले. आज सकाळी सहाच्या सुमारास ते त्या ठिकाणी गेले असता बंगल्याचा मुख्य दरवाजा त्यांना तोडलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यानंतर त्यांनी बंगल्यात प्रवेश करून पाहणी केली असता आतील सामानाचीही तोडफोड झाल्याचे निदर्शनास आले. सीसीटीव्हीही संबंधितांनी तोडून टाकले. या प्रकरणात दीड लाखाची रोकड लंपास झाल्याचा अंदाज आहे. दोघे चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. मात्र, दोघेही चोरटे चांगल्या घरातील असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. माळकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सावंतवाडी पोलिस ठाण्यात दोघांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबतची माहिती पोलिसांना मिळाल्यावर पोलिस हवालदार केरकर यांनी घटनास्थळी जात पंचनामा केला. त्यानुसार याबाबत श्री. केरकर अधिक तपास करीत आहेत.

७३७४७


पेंडूर ग्रामपंचायतीचे
कार्यालय फोडून नासधूस
---
प्रकाराने खळबळ; कागदपत्रे विस्कटली
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. ६ ः तालुक्यातील पेंडूर ग्रामपंचायत चोरट्यांनी फोडून सामानाची नासधूस केली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. मात्र, ग्रामपंचायतीत कोणत्याही प्रकारच्या वस्तूची चोरी झाली नसल्याचे निदर्शनास आले. यामुळे ही ग्रामपंचायत चोरीच्या की अन्य कोणत्या उद्देशाने फोडली, याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे.
आज सकाळी पेंडूर ग्रामपंचायत ही अज्ञातांनी फोडल्याचे निदर्शनास आले. चोरट्याने ग्रामपंचायतीच्या मागील लोखंडी दरवाजाचे कुलूप तोडले. टपाल, ग्रामपंचायत कार्यालय आणि ग्रामपंचायतचा हॉल यांची कुलपे व त्यातील कपाटे फोडून चोरीचा प्रयत्न केला. या वेळी आतील सर्व सामान व कागदपत्रे विस्कटून टाकलेली होती. याबाबत पेंडूरच्या सरपंच गीतांजली कांबळी व सदस्य नीलेश वैद्य यांनी माहिती दिली. दरम्यान, ग्रामपंचायत कार्यालयात असलेले संगणक, बॅटरी आदी वस्तू जशाच तशा असल्याने ही ग्रामपंचायत चोरीच्या हेतूने की अन्य कोणत्या हेतूने फोडली, याबाबत चर्चा सुरू आहे. याबाबत सरपंच कांबळी यांनी वेंगुर्ले पोलिसांत तक्रार दिली. गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक अतुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस रंजिता चौहान करीत आहेत.