वैभव नाईकांच्या मालमत्तेची चौकशी सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वैभव नाईकांच्या मालमत्तेची चौकशी सुरू
वैभव नाईकांच्या मालमत्तेची चौकशी सुरू

वैभव नाईकांच्या मालमत्तेची चौकशी सुरू

sakal_logo
By

73849
कणकवली : येथील आमदार वैभव नाईक यांच्या बंगल्‍याची मोजमापे बांधकाम विभागाच्या अभियंत्‍यांकडून शनिवारी घेण्यात आली.

वैभव नाईकांच्या मालमत्तेची चौकशी सुरू
सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतली बंगला, दुकानांची मोजमापे
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. ७ : कुडाळ-मालवण मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांच्या मालमत्तांची मोजमापे घेण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पथकाकडून आज सुरू करण्यात आले आहे. गडनदीलगतच्या बंगल्‍याची आणि दुकानाची मोजमापे घेण्यात आली.
आमदार नाईक यांना तीन डिसेंबरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशीची नोटीस दिली होती. त्‍यानंतर त्यांची ‘लाचलुचपत’च्या रत्‍नागिरी येथील पथकाकडून चौकशीही करण्यात आली होती तर आजपासून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पथकाकडून त्यांच्या बंगल्‍याची मोजमापे घेण्याचे काम सुरू करण्यात आले.
गडनदीलगत आमदार नाईक यांनी नव्याने बंगला बांधला आहे. नरडवे रस्त्यालगत दुकान, शिरवल येथे क्रशर आणि पाईप फॅक्‍टरी आहे. या सर्व मालमत्तांची मोजमापे घेऊन मूल्‍यांकनाचे काम सुरू झाले आहे. सार्वजनिक बांधकामचे उपअभियंता के. के. प्रभू, अभियंता प्रमोद कांबळी यांच्यासह राज्य उत्पादन विभागाच्या एका पथकाकडून मोजमापे घेतली जात होती. आमदार नाईक यांच्या बंगल्याची मोजमापे घेतल्यानंतर बंगल्याला किती कोटी रुपये खर्च आला, नाईक यांनी आपल्या व्यवहारात या बांधकामासाठी किती खर्च दाखवला आहे, याचे ऑडिट केले जाण्याची शक्यता आहे.

ठाकरेंसोबत राहिल्याने सरकारकडून त्रास
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिल्‍याने राज्‍य सरकारकडून आपणास नाहक त्रास दिला जात असल्‍याचा आरोप आमदार नाईक यांनी केला. चौकशीला संपूर्ण सहकार्य करणार असल्‍याचेही त्‍यांनी सांगितले. मी कुठल्‍याही दबावाला बळी पडणार नाही. मी माझ्या हिंमतीवर कमवले असून आजोबांपासून सुरू असलेले उद्योग आणि व्यवसाय पुढे चालवत आहे. माझे सर्व व्यवसाय जाहीर आहेत. त्‍यामुळे कुठल्‍याही चौकशीला घाबरत नाही. मला जेवढा त्रास दिला जाईल, तेवढी जनताच मतदानातून सरकारला उत्तर देईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्‍त केला. गेल्या वीस वर्षांतील मालमत्तेचे जेवढे तपशील उपलब्‍ध होत आहेत तेवढी माहिती लाचलुचपत विभागाला देत असल्‍याचेही नाईक म्‍हणाले.