
राजापूर-वस्तुस्थिती मांडणाऱ्या साहित्यिकांची गरज
rat7p28.jpg
73864
राजापूरः साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष शरद गोरे. शेजारी गंगाराम गवाणकर, हरिश रोग्ये, नवीनचंद्र बांदिवडेकर, अलका नाईक आदी.
-----------
वस्तुस्थिती मांडणाऱ्या साहित्यिकांची गरज
शरद गोरे; जैतापूरला साहित्य संमेलनाचे उदघाटन
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ८ः साहित्य हे विश्वव्यापक असणे गरजेचे असून जातीपातीच्या भिंती तोडून त्याची मांडणी साहित्यिकांनी केले पाहिजे. देशातील सत्य वस्तुस्थिती मांडणाऱ्या खऱ्या साहित्यिकांची देशाला गरज आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष शरद गोरे यांनी जैतापूर येथे केले.
देशात युगनायक म्हणून महत्वाची भूमिका बजावणारे महामानव (कै.) भागोजीशेठ कीर यांच्या कार्याचा गौरव करणारे साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यासाठी वेळ लागणे हे दुर्दैवी असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, अखिल भारतीय भंडारी समाज महासंघ, जैतापूर एज्युकेशन सोसायटी आणि राजापूर तालुका जनता परिषद यांच्यावतीने कोकणातील पहिले साहित्य संमेलन आज जैतापूर येथील न्यू इंग्लिश स्कूल, श्रीमती स्नेहलता रामचंद्र कनिष्ठ महाविद्यालय येथे आयोजन केले आहे. त्याचे उदघाटन शनिवारी (ता. ७) झाले. या वेळी प्रसिद्ध वस्त्रहरणकार गंगाराम गवाणकर, डॉ. प्रा. प्रदीप ढवळ, अंकुर कीर, प्रेमा कीर, अखिल भारतीय भंडारी समाजाचे अध्यक्ष नवीनचंद्र बांदिवडेकर, राजापूर तालुका जनता परिषदेचे अध्यक्ष हरिश रोग्ये, अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे महाराष्ट्र संघटक अमोल कुंभार आदी उपस्थित होते. याप्रसंगी न्यू इंग्लिश स्कूलच्या शतकोत्तर स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. त्यामध्ये राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेले दिवाकर आडविरकर यांच्यासह सुमारे १५० मान्यवरांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.