दोन शिळा कोसळल्या वस्तीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दोन शिळा कोसळल्या वस्तीत
दोन शिळा कोसळल्या वस्तीत

दोन शिळा कोसळल्या वस्तीत

sakal_logo
By

rat7p29.jpg
73874
चिपळूणः परशुराम घाटातील खोदाईवेळी वस्तीत कोसळलेल्या शिळेची पाहणी करताना ग्रामस्थ.

परशुराम घाटात वस्तीत कोसळल्या शिळा
खोदाईवेळी सुरक्षेचे तीनतेरा; ग्रामस्थ पुन्हा भयग्रस्त
चिपळूण, ता. ७ः मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटातील डोंगरात सुरू असलेल्या खोदाईवेळी दोन दगड शनिवारी (ता. ७) सकाळी पायथ्याशी वसलेल्या पेढे बौद्धवाडीतील भर लोकवस्तीत एका घराजवळ पडले. यामध्ये घरातील साहित्याचे किरकोळ नुकसान झाले असले तरी या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. गतवर्षी एका घरावर दगड कोसळल्यानंतरही महामार्ग कंत्राटदार कंपनीची सुरक्षेबाबतची बेपर्वाई सुरूच असल्याचे दिसून येत आहे.
गेल्या वर्षभरापासून परशुराम घाटातील चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. त्यासाठी सुरू असलेली डोंगरखोदाई आणि नागरिकांची सुरक्षितता यारून वारंवार प्रश्न उपस्थित होत असतानाच गतवर्षी डोंगरातून निसटलेला भलामोठा दगड हा थेट पायथ्याशी वसलेल्या बौद्धवाडीतील एका घराची भिंत फोडून घुसला. सुदैवाने, घरी कोणीच नसल्याने मोठा अनर्थ टळला. यामध्ये घरमालकास नुकसानभरपाई कंत्राटदार कंपनीकडून दिली गेली. त्यानंतर घाटात संरक्षक भिंत उभारण्याचा निर्णय घेण्यात आला; मात्र शनिवारी डोंगरातून ज्या ठिकाणाहून दगड खाली आला त्या ठिकाणी संरक्षक भिंतीची उभारणीच नव्हती. कोसळलेला दगड एका घराजवळ येऊन पडताना तेथे ठेवण्यात आलेल्या साहित्याची मोडतोड होऊन नुकसान झाले आहे. घटनेनंतर माजी सरपंच प्रवीण पाकळे यांनी प्रशासनाला कळवले. त्यानंतर ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामसेवक, महामार्ग, कंपनीच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली.

चौकट
मोठ्या दुर्घटनेची वाट पाहताहेत?
मुळातच डोंगरातील खोदाईतील दगड थेट रस्त्यावरून थेट लोकवस्तीत येऊन पडत असेल तर कंपन्यांची सुरक्षा नेमकी काय आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे. घाटाच्या पायथ्याशी पेढे गाव वसलेले आहे. घाटातून हजारो वाहने ये-जा करत असतात. त्यामुळे या सर्वांच्या सुरक्षेच्यादृष्टीने काय उपाययोजना आहेत याचाही प्रशासनाने शोध घेण्याची गरज आहे. एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच उपाययोजनांकडे लक्ष देणार का, असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.