मुख्याध्यापकास मारहाण; आठ जणांवर गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुख्याध्यापकास मारहाण; आठ जणांवर गुन्हा
मुख्याध्यापकास मारहाण; आठ जणांवर गुन्हा

मुख्याध्यापकास मारहाण; आठ जणांवर गुन्हा

sakal_logo
By

मुख्याध्यापकास मारहाण; आठ जणांवर गुन्हा

सावंतवाडी तालुक्यातील प्रकार; बेपत्ता शिक्षक परतले

सावंतवाडी, ता. ८ ः शिक्षक बेपत्ताप्रकरणी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकाला मारहाण करणाऱ्या संबंधित शिक्षकाच्या कुटुंबातील आठ जणांविरुद्ध येथील पोलिस ठाण्यात सरकारी कामात अडथळा व अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. मारहाणीची घटना काल (ता.७) सकाळी अकराला घडली होती. रेश्मी विजय पाटकर, विजय शशिकांत पाटकर, वैष्णवी विजय पाटकर यांच्यासह संजीव शंकर मोहिते, प्रतीक संजीव मोहिते, शैला संजीव मोहिते, प्रियंका संजीव मोहिते आणि अन्य एकावर गुन्हा दाखल झाला.
दरम्यान, सहा दिवसांपासून बेपत्ता असलेले शिक्षक आज आपल्या घरी परतले. त्यांनी सकाळी येथील पोलिस ठाणे गाठत याबाबत माहिती दिली. शाळेत अतिरिक्त शिक्षक ठरविल्यामुळे आपण मानसिक तणावाखाली होतो. त्यामुळे एसटी बसने शिर्डी येथे निघून गेल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. शिक्षक बेपत्ता होऊन पाच दिवस उलटल्यामुळे पंचक्रोशीतील पालकांनी काल (ता. ७) शाळेत धाव घेत संस्थाचालक व मुख्याध्यापकांकडे त्यांचा शोध घेण्याची मागणी केली. मुख्याध्यापकांमुळेच शिक्षक बेपत्ता झाले असून याला तुम्ही जबाबदार आहात, असा आरोप करीत शिक्षकाची पत्नी, भाऊ तसेच भावजय व अतिरिक्त शिक्षकाच्या पत्नी, भाऊ, मुलगा, मुलीने मुख्याध्यापकांना मारहाण केली होती. हा प्रकार शाळेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला. याबाबत मुख्याध्यापकांनी आज सकाळी पोलिस ठाणे गाठत तक्रार दिली. या सर्व नाट्यमय घडामोडींनंतर बेपत्ता झालेले शिक्षक हे स्वतः आज पोलिस ठाण्यात हजर झाले. त्यामुळे पोलिसही आवाक झाले. शाळेने अपणास अतिरिक्त ठरवल्यामुळे मानसिक तणावाखाली होतो. त्यामुळे कुणकेरी, कोलगाव येथे काही काळ घालवल्यावर सावंतवाडीतून एसटीने शिर्डी येथे निघून गेलो; परंतु पत्नी व मुलांची आठवण येत असल्यामुळे आज सावंतवाडीत परत आलो, अशी माहिती त्यांनी पोलिसांना दिली. यावेळी बेपत्ता व्यक्ती परत मिळाल्यामुळे तो तपास थांबविल्याची माहिती पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी दिली. दरम्यान, मुख्याध्यापकांना मारहाण प्रकरणी संबंधितांवर कारवाई झाली. उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. रोहिणी सोळंके यांनी पोलिस ठाण्यात आज दिवसभर हा गुन्हा नोंदवून घेत तपास केला.