
सुतार समाज मंडळ जिल्हाध्यक्षपदी मेस्त्री
सुतार समाज मंडळ जिल्हाध्यक्षपदी मेस्त्री
वेंगुर्ले ः सिंधुदुर्ग जिल्हा श्री विश्वकर्मा सुतार शिल्पकार समाज मंडळाच्या जिल्हाध्यक्षपदी वेंगुर्ला येथील सामाजिक कार्यकर्ते शरद मेस्त्री यांची एकमताने निवड करण्यात आली. मंडळाच्या झाराप येथील कार्यालयात काल (ता. ८) झालेल्या बैठकीनंतर नूतन कार्यकारिणी निवडण्यात आली. अन्य कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्ष रितेश सुतार (वैभववाडी), सचिव राजन पांचाळ (पिंगुळी), खजिनदार अनंत मेस्त्री (माणगाव), सहसचिव गुरुनाथ मेस्त्री (साळगाव), सदस्य आनंद मेस्त्री (वाडोस), महेश सुतार (कणकवली), नारायण सुतार (दोडामार्ग), सुनील मेस्त्री व प्रभाकर मेस्त्री (वजराठ), राजन मेस्त्री (डिगस), शैलेश मेस्त्री (सावंतवाडी), महादेव मेस्त्री (पुळास), स्वप्नाली मेस्त्री व नारायण मेस्त्री (झाराप), बाबाजी मेस्त्री (मालवण) यांचा समावेश आाहे. मावळते अध्यक्ष आनंद मेस्त्री यांनी मेस्त्री यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
...............
अंगारक योगामुळे देवगडात उलाढाल
देवगड ः नूतन वर्षाच्या सुरुवातीलाच अंगारकी संकष्टी चतुर्थीचा योग आल्याने येथील बाजारात फळे, फुले यांची उलाढाल झाली. अंगारक योगामुळे उद्या (ता. १०) येथील किल्ला गणपती मंदिरासह तालुक्यातील दाभोळे तसेच तळेबाजार मंदिरात दर्शनासाठी गर्दी होण्याची शक्यता आहे. नूतन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात अंगारकी संकष्टीचा योग आल्याने गणेश भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. यानिमित्ताने येथील बाजारात खरेदीसाठी मोठी उलाढाल झाली. काही पर्यटकही श्री क्षेत्र गणपतीपुळे येथील गणपती मंदिरात दर्शनाच्या निमित्ताने आजपासूनच किनारी भागात पर्यटनासाठी आल्याचे चित्र होते. आज काहींनी येथील पर्यटनस्थळांना भेटी देऊन गणपतीपुळे गाठल्याचे दिसत होते.
.................
देवगडात गारठा वाढला
देवगड ः तालुक्याच्या किनारपट्टी भागात आज थंडी पसरली होती. मागील काही दिवसापासून वातावरणात बदल जाणवू लागला आहे. थंडीचे प्रमाण वाढत असल्याने ग्रामीण भागातील काजू कलमे मोहोरण्यास सुरूवात झाली आहे. आंबा कलमांना अजून मोठ्या प्रमाणात मोहोर आला नसल्याचे सार्वत्रिक चित्र असले तरी त्यादृष्टीने पोषक वातावरण तयार होत असल्याने बागायतदार आशा बाळगून आहेत. वातावरणातील गारवा वाढला आहे. पहाटे धुके पसरलेले असते. किनारी भागात चांगलाच गारठा स्थानिक अनुभवत आहेत.