रुंदीकरण पहिल्‍या टप्प्यासाठी ३३ कोटी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रुंदीकरण पहिल्‍या टप्प्यासाठी ३३ कोटी
रुंदीकरण पहिल्‍या टप्प्यासाठी ३३ कोटी

रुंदीकरण पहिल्‍या टप्प्यासाठी ३३ कोटी

sakal_logo
By

74793
कणकवली ः कणकवली आचरा या राज्‍यमार्गाचे रुंदीकरण होणार आहे. त्‍याअनुषंगाने कणकवली ते बेळणे हद्दीपर्यंतच्या रस्त्याचे सर्वेक्षण केले जात आहे.


रुंदीकरणाच्या पहिल्‍या टप्प्यासाठी ३३ कोटी

कणकवली-आचरा राज्‍यमार्ग; महामार्ग ते बेळणे हद्दीपर्यंतच्या कामाचा समावेश

सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. ११ ः मुंबई-गोवा राष्‍ट्रीय महामार्ग ते सागरी महामार्ग यांना जोडणाऱ्या कणकवली ते आचरा या राज्‍यमार्गाचे रुंदीकरण होणार आहे. एकूण ३८.८ किलोमीटर लांबीच्या या मार्गापैकी राष्‍ट्रीय महामार्ग ते बेळणे गाव हद्दीपर्यंतच्या १५ किलोमीटर पर्यंतच्या रुंदीकरण कामासाठी ३३ कोटी रुपयांची तरतूद राज्‍याच्या अर्थसंकल्‍पात करण्यात आली आहे. त्‍यानुसार या कामाचे सर्वेक्षणही करण्यात येत असून लवकरच या कामाला प्रारंभ होण्याची शक्‍यता आहे.
पर्यटनाच्या दृष्‍टीने महत्त्वपूर्ण असलेल्‍या कणकवली-आचरा मार्गावरील कणकवली शहर हद्द ते बेळणे गावापर्यंतचे सर्वेक्षण सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने गेल्‍या चार दिवसांपासून सुरू आहे. पुढील दोन दिवसांत हे सर्वेक्षण पूर्ण होईल. त्‍यानंतर वस्तुस्थिती दर्शक अहवाल शासनाला सादर होणार आहे. या अहवालानंतर निविदा प्रक्रिया होऊन प्रत्‍यक्ष कामाला प्रारंभ होणार आहे. उंबर्डे ते कनेडी, कणकवली ते आचरा या रस्त्याला राज्‍यमार्ग १८१ चा दर्जा देण्यात आला आहे. या संपूर्ण रस्त्याचे दुपदरीकरण, तर कणकवली शहर हद्दीत तीनपदरी रस्ता शासनाने प्रस्तावित केला आहे. यातील राष्‍ट्रीय महामार्ग ते बेळणे गाव हद्दीपर्यंतच्या १५ किलोमीटर रस्ता रुंदीकरणाचे काम राज्‍याने प्रस्तावित केले आहे. सध्या कणकवली ते आचरा हा रस्ता ५ मीटर रुंदीचा आहे. पुढील काळात या रस्त्याची रुंदी ७ मीटरची होणार आहे. त्‍याचबरोबर या रस्त्याच्या दुतर्फा गटार बांधकामही होणार आहे. या कामासाठी ३३ कोटींची तरतूद शासनाने राज्‍याच्या बजेटमध्ये केली आहे. सध्या रस्ता रुंदीकरणाबाबत सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सर्वेक्षण केले जात आहे. या सर्वेक्षणाचा अहवाल राज्‍याला सादर केला जाणार असल्‍याची माहिती बांधकामच्या उपअभियंता के. के. प्रभू यांनी दिली.
--------
चौकट
रखडलेल्‍या पर्यायी रस्त्यालाही चालना
कणकवली-आचरा मार्गावरील कणकवली शहर आणि कलमठ गावच्या हद्दीत वाहतूक कोंडी होत असल्‍याने शहरातील बसस्थानकालगत ते कलमठ, आशिये, वरवडे असा पर्यायी राज्‍य मार्ग काढण्यात आला होता. मात्र, निधीअभावी या रस्त्याचे काम ठप्प झाले होते. आता बजेटमध्ये ३३ कोटींची तरतूद झाल्‍याने या रस्त्याचेही काम मार्गी लागणार आहे.
-----------
कोट
कणकवली-आचरा या राज्‍यमार्गातील कणकवली शहर हद्दीतील रस्ता पोस्ट खात्‍याकडून जागा उपलब्‍ध होत नसल्‍याने रखडला आहे. भूसंपादन करून रस्त्याला आवश्‍यक असणारे क्षेत्र आम्‍ही ताब्‍यात घेण्याचा प्रयत्‍न करत आहोत. त्‍याअनुषंगाने केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून पोस्ट नवी दिल्‍ली येथील मुख्य प्रशासकीय अधिकाऱ्यांची लवकरच बैठक होईल आणि भूसंपादनाचा प्रश्‍न मार्गी लागणार आहे.
- बंडू हर्णे, उपनगराध्यक्ष, कणकवली