चिपळूण अर्बनवर निवडून गेलेल्यांचा पालिकेतून पत्ता कट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण अर्बनवर निवडून गेलेल्यांचा पालिकेतून पत्ता कट
चिपळूण अर्बनवर निवडून गेलेल्यांचा पालिकेतून पत्ता कट

चिपळूण अर्बनवर निवडून गेलेल्यांचा पालिकेतून पत्ता कट

sakal_logo
By

बँकेवर निवडून गेलेल्यांचा पालिकेतून पत्ता कट?
चिपळूण अर्बनची निवडणुक बिनविरोध; नव्यांना संधीसाठी जुन्या संचालकांना विश्रांती
चिपळूण, ता. ११ः अर्बन बँकेत बिनविरोध निवडून गेलेल्या संचालकांचा चिपळूण पालिका निवडणुकीतून पत्ता कट झाल्याची चर्चा आहे. ज्यांनी अर्बन बँकेच्या निवडणुकीतून माघार घेतली त्यांचा पालिका निवडणुकीत विचार केला जाणार असल्याचेही बोलले जात आहे.
सहकार क्षेत्रात अग्रेसर असलेल्या चिपळूण अर्बन बँकेची निवडणूक बिनविरोध झाली. बँकेवर संचालक म्हणून काम करण्यासाठी तब्बल ४८ जण इच्छुक होते. त्यातून १५ जणांचे पॅनेल निवडताना बँकेचे ज्येष्ठ संचालक आणि सहकार क्षेत्रात काम करणाऱ्यांची मोठी कसरत झाली. चिपळूण अर्बन बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी माजी चेअरमन संजय रेडीज, सुचय रेडीज, उमेश काटकर आदींनी मोलाचे योगदान दिले. सहकार क्षेत्रात काम करणाऱ्या नव्या कार्यकर्त्यांची संख्या वाढल्यानंतर जुन्या संचालकांना या वेळी विश्रांती देण्यात आली. त्यांना पुढील निवडणुकीत संधी देण्याचे आश्वासन देण्यात आले, तर काहींना पालिका निवडणुकीत संधी दिली जाईल, असेही आश्वासन दिले आहे.
जे लोक पालिकेत नगरसेवक म्हणून आणि बँकेवर संचालक म्हणून दोन्ही ठिकाणी काम करण्यास इच्छुक होते, त्यांना बँकेवर संचालक म्हणून नेमणूक करताना पालिकेतील पत्ता कट केला आहे; मात्र ज्या भागात स्पर्धा नव्हती त्या भागातील कार्यकर्ते पालिका आणि बँक दोन्ही ठिकाणी काम करण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे होऊ घातलेल्या पालिका निवडणुकीत कोणाकोणाचा पत्ता कट होणार याची उत्सुकता अनेकांना लागली आहे. चिपळूण पालिकेत नगरसेवक म्हणून ज्यांनी काम पाहिले त्यांना व काहींच्या कुटुंबीयांना बँकेत संचालक म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे. त्यांना पालिका निवडणुकीत पुन्हा काम करण्याची संधी मिळेल का, याचीही उत्सुकता आहे.

कोट
चिपळूण अर्बन बँकेची निवडणूक सर्वपक्षीय पॅनेलच्या माध्यमातून लढवली गेली. पालिका निवडणुकीत सर्व पक्ष वेगवेगळे लढणार आहेत. त्यामुळे काहींना आश्वासन दिले गेले असेल तर ते त्यांच्या पक्षाकडून असेल. जिथे दोघांमध्ये स्पर्धा होती तेथे एकाला बँक आणि दुसऱ्याला चिपळूण पालिका असा पर्याय निवडला गेला असेल; पण आमच्या प्रभागात तशी परिस्थिती नाही.
- अविनाश केळकर, संचालक, चिपळूण अर्बन बँक