
एसटीचा लवकरच डिझेल पंप होणार सुरू
rat ११३२.txt
(पान ३ साठी)
एसटीचा लवकरच डिझेल पंप होणार सुरू
महिनाभरात कार्यान्वित ; सध्या खासगी पंपाचा आधार
रत्नागिरी, ता. १२ ः गेली अनेक वर्षे एसटी महामंडळाकडे एका ऑईल कंपनीद्वारे एसटी आगारांना डिझेल पुरवठा केला जात होता. महामंडळाकडून बिले द्यायला उशीर झाला की, डिझेल पुरवठा खंडित केला जात होता. यामुळे एसटीचे वेळापत्रक कोलमडून प्रवाशांची गैरसोय होत होती. ते टाळण्यासाठी खासगी पंपावर डिझेल भरले जाते. मात्र, आता रत्नागिरीत आगारात नवीन डिझेल पंपाला मंजुरी मिळाली आहे. येत्या काही दिवसात काम पूर्णत्वाला जाणार आहे. त्यामुळे महिनाभरात एसटीला आपल्या हक्काच्या पंपात डिझेल भरता येणार असल्याची माहिती रत्नागिरी एसटी विभागाकडून देण्यात आली.
एसटी महामंडळाचे येथील आगारामध्ये दोन डिझेल पंप आहेत. त्यासाठी ऑइल कंपनीकडून डिझेल टॅंकर मागवला जात होता. त्यासाठी एसटीला संबंधित ऑइल कंपनीला डिझेल टॅंकरची आगाऊ रक्कम भरावी लागत होती तर टॅंकर मिळत होता; परंतु कोरोना काळात बिले थकल्याने डिझेल पुरवठा करणे संबंधित कंपनीने बंद केले. त्या नंतर महामंडळाने खासगी पेट्रोल पंपांवर डिझेल भरण्यास काही महिन्यांपासून सुरू केले आहे. ऑइल कंपनीकडून मागवण्यात येणाऱ्या डिझेलपेक्षा खासगी पेट्रोल पंपावरील डिझेल एसटीला काही रुपये स्वस्त पडत आहे; परंतु त्यासाठी निवडलेल्या पेट्रोल पंपांवर एसटीच्या गाड्यांना रांगा लावून डिझेल भरावे लागते. त्यामुळे आता नियमितपणे सर्व एसटीच्या गाड्या खासगी पेट्रोल पंपात डिझेल भरत आहेत. एसटी महामंडळाने स्वतंत्र डिझेल पंपाची मागणी केली होती. ती मंजूर झाली आहे. त्यामुळे आता रत्नागिरी आगारालगत नवीन पंप सुरू होणार आहे.
उत्पन्नात होणार वाढ...
नवीन डिझेल पंपात सीएनजीदेखील नागरिकांसाठी उपलब्ध होणार आहे. या माध्यमातून अधिकचे उत्पन्न महामंडळाच्या तिजोरीत जमा होणार आहे. यापुढे एसटीला डिझेलसाठी कोणावरही अवलंबून राहावे लागणार नाही असे रत्नागिरी एसटी विभागाकडून सांगण्यात आले.