रत्नागिरी ः सुधारित नळपाणी योजनेत खर्चाची धार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी ः सुधारित नळपाणी योजनेत खर्चाची धार
रत्नागिरी ः सुधारित नळपाणी योजनेत खर्चाची धार

रत्नागिरी ः सुधारित नळपाणी योजनेत खर्चाची धार

sakal_logo
By

रत्नागिरी पालिका ठेकेदाराकडून वेठीस?
---
सुदेश मयेकर; वाढीव रकमेची मागणी, दुरुस्ती पालिकेकडे

लोगो-
सुधारित नळपाणी योजना

रत्नागिरी, ता. १३ ः सुधारित नळपाणी योजना आता पैशांचे कुरणच बनली, अशी चेष्टा सुरू झाली आहे. कारण, ठेकेदाराला तीनवेळा मुदतवाढ देण्यात आली. त्यानंतर वाढीव नऊ कोटी रुपये पालिकेने अदा केले, तरी ठेकेदाराची वाढीव रकमेची मागणी सुरू आहे. पुन्हा ठेकेदाराने पानवल ते नाचणे या दरम्यान एक हजार ६०० मीटर पाइपलाइनच्या कामासाठी अधिक पैशांची मागणी केली आहे. झालेल्या कामाबाबत अनेक तक्रारी आहेत. वारंवार पाईप फुटत आहेत आणि पालिकाच याची दुरुस्ती करून ठेकेदाराची भांडी का घासतेय, हे कळत नाही. ठेकेदाराला वाढीव रक्कम देण्यास आमचा विरोध असून, याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणार आहोत, असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक सुदेश मयेकर यांनी दिले.
नवीन पाणीयोजना असूनही वारंवार ती फुटत आहे. त्याबाबत अनेक तर्क-वितर्क मांडले जात आहेत. काही म्हणतात त्याची चाचणी सुरू आहे, काही म्हणतात पाइपलाईन कमी दर्जाची असल्याने ती फुटत आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून दर्जाबाबत वारंवार प्रश्न उपस्थित केले जातात. शहरातील सुधारित पाणीयोजना म्हणजे सोन्याची अंडी देणारी कोंबडी तर ठरत नाही ना, अशी शंका व्यक्त होत आहे. यापूर्वी तीनवेळा ठेकेदाराला मुदतवाढ देण्यात आली. पूर्ण न झालेल्या या योजनेची ठेकेदाराची बिले मात्र विनासायास निघत आहेत. नवीन पाणीयोजना असून, पाइपलाइन का फुटत आहे, याबाबत कोणतीही विचारणा न करता ठेकेदारावर मेहेरबानी केली जात असल्याचा विरोधकांचा आरोप आहे.
पालिकेची विस्तारित नळपाणी योजना मुळात ६३ कोटींची होती. ठेकेदाराने वेळेत काम सुरू केले नाही. कोरोना काळात बहुतांश काम ठप्प होते. त्यानंतरही कामाला गती आली नाही. दोन वर्षांत पूर्ण करण्याची योजना चार वर्षे उलटूनही अपूर्णच आहे. पाईपचे दर वाढले म्हणून काम अडवून ठेवले होते. शासनाने नऊ कोटी रुपये वाढवून दिले. त्यापैकी निम्मे पैसे ठेकेदाराला देण्यात आले आहेत. काम वेळेत पूर्ण केले नाही तरी ठेकेदार वाढीव पैशांची मागणी करीत आहे आणि त्याला पैसेही दिले जात आहेत, हा विरोधकांचा आक्षेप आहे. पानवल येथून येणारे पाणी ग्रॅव्हिटीने येते. त्यामुळे वीजबिल वाचते, तेव्हा हे काम जलदगतीने व्हायला हवे होते; पण विलंब झाल्याने भुर्दंड जनतेला सोसावा लागत आहे, असा आरोप मयेकर यांनी केला.
---------
चौकट-
प्रशासनच पुढे-पुढे धावतेय
सुधारित नळपाणी योजना आर्थिक कुरणच बनू लागली आहे. यापूर्वी ठेकेदाराला मुदतवाढ देऊन नऊ कोटींची वाढीव रक्कम दिली. तरी ही योजना अपूर्ण आहे. शहरात वारंवार पाइपलाईन फुटते; परंतु ठेकेदार काही न करता पालिका प्रशासनच पुढे-पुढे धावत का आहे? या योजनेची स्वतंत्र समितीकडून तपासणी करून एक वर्ष ती ठेकेदार कंपनीने वापरून पालिकेला हस्तांतरित करायची. आणखीही काही त्रुटी असून, याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहे. हा भोंगळ कारभार थांबला नाही तर आम्ही न्यायालयात दाद मागू, अशी प्रतिक्रिया मयेकर यांनी दिली.
-----------------
कोट
पानवल ते नाचणेदरम्यान टाकण्यात येणाऱ्या पाइपलाईनचा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने पूर्वी केलेला सर्व्हे आणि आताच्या सर्व्हेत सुमारे तीन किलोमीटर अंतर वाढत आहे. त्यात जीआय पाईपची किंमतही पूर्वीपेक्षा वाढली. त्या अनुषंगाने ठेकेदाराने वाढीव रकमेची मागणी केली आहे.
- तुषार बाबर, मुख्याधिकारी आणि प्रशासन अधिकारी, रत्नागिरी पालिका