शिंदे गट संपविण्याचा भाजपचा प्रयत्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिंदे गट संपविण्याचा भाजपचा प्रयत्न
शिंदे गट संपविण्याचा भाजपचा प्रयत्न

शिंदे गट संपविण्याचा भाजपचा प्रयत्न

sakal_logo
By

75493
सावंतवाडी ः आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना अनारोजिन लोबो. शेजारी अशोक दळवी नारायण राणे आदी.

शिंदे गट संपविण्याचा भाजपचा प्रयत्न

अनारोजीन लोबो ः विरोधात बसूनच खरेदी-विक्री संघात ताकद दाखवू

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १४ ः भाजप व शिंदे गटात युतीचा धर्म पाळा, असे वरिष्ठांचे आदेश असतानाही सावंतवाडीत भाजपने खरेदी-विक्री संघात धोका देऊन त्या ठिकाणी आपले संचालक बसविले. येथील भाजप शिंदे गटाला संपविण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप खरेदी विक्री संघाच्या संचालक तथा माजी नगरसेविका अनारोजीन लोबो यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला. तर येणाऱ्या काळात खरेदी-विक्री संघात विरोधातच बसून आमची ताकद दाखवून देऊ, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
येथील खरेदी-विक्री संघाच्या काल (ता. १३) झालेल्या निवडणुकीत भाजपने शिंदे गटाला डावलून तज्ज्ञ संचालक निवडले होते. यावेळी अभिमन्यू लोंढे आणि गुरू पेडणेकर यांना संधी देण्यात आली. याला विरोध करण्यासाठी शिंदे गटाच्या सदस्यांनी निवड प्रक्रियेदरम्यान सभात्याग केला होता. या पार्श्वभूमीवर संतप्त झालेल्या शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आपली भूमिका मांडण्यासाठी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी लोबो यांनी आपली भूमिका मांडली. यावेळी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, तालुका प्रमुख नारायण राणे, विश्वास घाग, गजानन नाटेकर, राजन रेडकर आदी उपस्थित होते.
लोबो पुढे म्हणाल्या, ‘‘खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीवेळी भाजपसोबत युतीचा धर्म म्हणून एकत्र आलो; परंतु निवडणूक झाल्यानंतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी रंग दाखविण्यास सुरुवात केली. अध्यक्ष निवडताना दोघांना अडीच-अडीच वर्षांचा कार्यकाल वाटून घेऊया, असे आम्ही सूचविले होते; परंतु आमची मागणी डावलण्यात आली आणि प्रमोद गावडे यांना पाच वर्षांसाठी अध्यक्षपद देण्यात आले. तीच परिस्थिती काल तज्ज्ञ संचालक निवडताना करण्यात आली. दगाबाजी करून तसेच आम्हाला विश्वासात न घेता दोघे संचालक निवडले आहेत. युती असल्यामुळे या ठिकाणी आम्हाला विश्वासात घेणे गरजेचे होते; परंतु तसे झाले नाही. वरिष्ठ नेत्याचे नाव सांगून आयत्यावेळी आमच्या उमेदवारांना डावलले, हा प्रकार योग्य नाही. त्यामुळे यापुढे आम्ही त्यांच्यासोबत असणार नाही. खरेदी-विक्री संघात त्यांच्या विरोधातच राहू. याबाबतची सर्व माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना दिली असून याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणार असल्याचे केसरकरांनी सांगितले आहे.’’ लोबो पुढे म्हणाल्या, ‘‘केंद्राच्या योजनेंतर्गत सावंतवाडीत बनविण्यात आलेल्या आयुष्यमान योजनेच्या यादीत घोळ झाला आहे. त्या ठिकाणी यादीत आलेल्या नावात गोरगरिबांना डावलून उद्योजक आणि धनदांडग्यांच्या नावांचा समावेश केला आहे. त्यामुळे ही यादी रद्द करून पुन्हा सर्वेक्षण करावे. या यादीत अनेक गरजूंची नावे समाविष्ट केलेली नाहीत. त्यामुळे ही यादी नेमकी कोणी बनविली, तसेच त्यासाठी लागणारा डाटा नेमका कोणी दिला? याची चौकशी होणे गरजेचे आहे.
---
‘आयुष्यमान भारत’मध्ये धनदांडगे
लोबो म्हणाल्या, ‘आयुष्यमान भारत’ योजनेची २०११ मध्ये केंद्रस्तरावरून यादी जाहीर केली होती. यात सावंतवाडी शहरात ७ हजार नागरिकांचा समावेश करून घेतला होता; मात्र या योजनेतून गरिबांची नावे वगळल्याची धक्कादायक बाब निदर्शनास आली. यादीची तपासणी केली असता लाभार्थ्यांच्या नावांमध्ये बडे उद्योजक, वैद्यकीय अधिकारी अशा धनदाडग्यांसह परप्रांतीयांचाही समावेश असल्याचे उघड झाले. त्यामुळे गरिबांवर होणारा अन्याय टाळण्यासाठी आणि त्यांनाही या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी नव्याने लाभार्थ्यांची यादी जाहीर करावी. तसेच या प्रकाराची वरिष्ठांकडून चौकशीही व्हावी.’’ दरम्यान, पत्रकार परिषदेत त्यांनी याबाबतचे पुरावे सादर करून संबंधित तयार केलेली यादी बनावट असल्याचा आरोप केला.