
बससेवा अनियमित, अधिकाऱ्यांना घेराओ
75537
सावंतवाडी ः एसटी प्रशासनातील अधिकाऱ्यांशी चर्चा करताना सातुळी-बावळाट ग्रामस्थ.
बससेवा अनियमित, अधिकाऱ्यांना घेराओ
सातुळी-बावळाटचा प्रश्न; चार दिवसांत कार्यवाहीची ग्वाही
सावंतवाडी, ता. १४ ः सातुळीसह बावळाट गावात जाणारी बससेवा सुरळीत व नियमित नसल्याने गेले पाच सहा महिने या दोन्ही गावांतील प्रवाशांसह विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. यासंदर्भात जाब विचारण्यासाठी आज दोन्ही गावांतील ग्रामस्थांनी आगार प्रमुखांना घेराव घातला. यावेळी सेवा सुरळीत होण्यासाठी तत्काळ कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली. येत्या चार दिवसांत संबंधित दोन्ही गावांतील बस सेवा नियमित करण्याचे आश्वासन आगार प्रमुख नरेंद्र बोधे यांनी दिल्यानंतर ग्रामस्थांनी माघार घेतली.
सातुळी आणि बावळाट या दोन्ही गावांसाठी सावंतवाडी बसस्थानकातून पहाटे साडेपाच, सकाळी सव्वा नऊ आणि दुपारी सव्वा बारा अशा तीन बस सुरू आहेत; परंतु या बसेस नियमित वेळेत सुटत नसल्यामुळे या दोन्ही गावांतील प्रवाशांसह विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. याबाबत स्थानक प्रमुख बोधे यांचे अनेक वेळा लक्ष वेधण्यात आले; परंतु याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने ग्रामस्थांनी बोधे यांना धारेवर धरले. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य संदीप गावडे, सातुळी बावळाट उपसरपंच स्वप्निल परब, माजी उपसरपंच बाबल बुराण, दया परब, सुरेश कदम, सुनील कानसे, दशरथ परब, गोविंद परब, बाबू सावंत, एकनाथ परब, शांताराम सावंत, उत्तम ठाकूर, प्रकाश कांबळे, सुजय परब, मोहन जाधव, कृष्णा सावंत, तुषार लातये, गिरिष गावडे, खेमराज सावंत, विनीत कदम, सूरज परब, प्रांजली पराब, स्नेहा परब, प्रणया परब, वैष्णवी बिरोडकर, सोमाजी परब, सहदेव बिरोडकर, दिनेश गावडे आदी बावळाट व सातुळी गावातील ग्रामस्थ, विद्यार्थी उपस्थित होते.