हिवाळा कडाडला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हिवाळा कडाडला
हिवाळा कडाडला

हिवाळा कडाडला

sakal_logo
By

75549
वाढलेली थंडी काजू पिकासाठी पोषक मानली जात आहे.
75550
फळधारणा झालेल्या आंबा पिकांसाठी काहीअंशी थंडी धोकादायक ठरणार आहे.


हिवाळा कडाडला

चार वर्षांनंतर थंडीत सातत्य; पिकांवर संमिश्र परिणाम शक्य

लीड
जागतिक तापमानवाढीमुळे ऋतुचक्र बदलून गेले. त्यामध्ये अत्यावश्यक आणि जिल्ह्याच्या फळबागांसाठी महत्त्वपूर्ण असणारा हिवाळा ऋतूच हरवून गेला होता. गेल्या चार वर्षांत प्रामुख्याने उन्हाळा आणि पावसाळा हे दोनच ऋतू अनुभवास येत होते; परंतु तब्बल चार वर्षांनंतर सातत्यपूर्ण कडाक्याची थंडी जिल्हावासीय अनुभवत असून चार वर्षांतील नीचांकी १० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद १० जानेवारीला झाली. या थंडीचा परिणाम हजारो बागायतदारांचे जीवनमान अवलंबून असलेल्या फळबागांवर होणार आहे; परंतु उशिराने थंडी पडल्याचा काहीअंशी फळधारणा झालेल्या आंबा पिकाला तोटादेखील होणार आहे.
- एकनाथ पवार
..................
हरवलेला हिवाळा
गेल्या काही वर्षांत जागतिक तापमानवाढीचे परिणाम विविध रुपाने सर्व जग भोगत आहे; परंतु या परिणामांचा विविधांगी फटका सिंधुदुर्ग जिल्ह्याला बसला आहे. गेल्या चार-पाच वर्षांत जागतिक तापमानवाढीचे परिणाम असलेली विविध वादळे किनारपट्टीवर घोंघावली. त्यातील तौक्ते, निसर्ग, फयानसारख्या वादळांनी जिल्ह्याचे कबरंडेच मोडले. तापमानवाढीचे परिणाम इथेच थांबले नाहीत, तर सातत्याने ढगाळ वातावरण, अवकाळी पाऊस, परतीचा पाऊस लांबणे, गारपीट यासारखे परिणाम दिसून आले. यामध्ये जिल्ह्यातील फळबागांची अतोनात हानी होऊ लागली. तापमानवाढीमुळे ऋतुचक्रच बदलून गेले आणि कोकणातील हजारो हेक्टर फळबागांसाठी अत्यावश्यक असलेला हिवाळा ऋतू हरवून बसला. ‘ऑक्टोबर हिट’नंतर झाडांना पालवी, मोहोर येण्यासाठी आवश्यक असलेली नोव्हेंबरमध्ये पडणारी थंडीच गायब झाल्यामुळे कोकणातील आंबा, काजू, कोकम, सुपारी यासारखी कोकणची ओळख असलेल्या पिकांमध्ये देखील अनियमितता दिसून येऊ लागली. थंडीअभावी अवेळी मोहोर येणे, फळधारणा होणे, त्याचा फळांच्या दर्जावर परिणाम होणे असे प्रकार होऊ लागले. त्यामुळे हजारो बागायतदार सातत्याने चिंतेत होते. नोव्हेंबर ते जानेवारीअखेर किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यात पूर्वी थंडी जाणवत होती; परंतु गेल्या काही वर्षांत सतत थंडी जाणवण्याचा योग कधी आला नाही. एक-दोन दिवस थंडी पडल्यानंतर ढगाळ वातावरण, वारा यामुळे थंडी नाहीशी होत होती. त्याचा एकूणच परिणाम फळ बागायती, रब्बी हंगामावर दिसून येत होता.
.....................
चार वर्षांनंतर थंडीचा कडाका
गेल्या चार वर्षांतील हिवाळा समजल्या जाणाऱ्या तीन महिन्यांतील मोजकेच दिवस थंडी पडली. या थंडीमध्ये कधीच सातत्य नव्हते. याशिवाय चार वर्षांत एखादा अपवाद वगळला तर १५ किंवा १६ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान आले होते. हे तापमानदेखील एक-दोन दिवसच राहिल्यामुळे थंडी जाणवली नाही आणि हिवाळा ऋतू असतो, हे देखील भासले नाही. यावर्षीदेखील नोव्हेंबर, डिसेंबर या दोन थंडीच्या महिन्यांनी हुलकावणी दिली होती; परंतु ९ जानेवारीपासून खऱ्या अर्थाने जिल्ह्यात थंडीचा प्रभाव जाणवू लागला. हिमालय पर्वत आणि लगतच्या भागांमध्ये हिमवृष्टी सुरू झाली आणि उत्तरेकडील थंड वारे महाराष्ट्रात वाहू लागले. त्याचा परिणाम म्हणून जिल्ह्यात थंडीची तीव्रता वाढली. या हरवलेल्या थंडीची जिल्ह्याला गरज होती. सध्या थंडीचे प्रमाण जिल्ह्यात इतके आहे की, चार वर्षांत प्रथमच शेकोट्यांची दृश्ये गावोगावी दिसत आहेत.
.................
थंडीचा फायदा
आंबा आणि काजूसह इतर फळपिके जिल्ह्याच्या अर्थकारणाच्या दृष्टीने महत्त्वाची आहेत. या सर्व पिकांसाठी थंडी आवश्यक असते. थंडीमुळे झाडांना पालवी आणि चांगला मोहोर फुटण्याची प्रकिया सहज सुलभ होते. आलेल्या मोहोराला चांगली फळधारणा होते. थंडीमुळे थ्रीप्स, तुडतुडा यांसह विविध कीडरोगांचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने विविध कीटकनाशकांच्या फवारण्या कमी होऊन उत्पादन खर्चदेखील कमी येतो. उत्तम दर्जाची फळे बागायतदारांना मिळतात. चांगल्या फळांना चांगला दर आणि शेतकऱ्याला आर्थिक फायदा होऊ शकतो. त्यामुळे थंडी अत्यावश्यक मानली जाते.
................
नुकसानाचीही भीती
सध्या पडत असलेली थंडी जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात पडत आहे. सध्या जिल्ह्यात १५ टक्के आंबा पिकाला फळधारणा असून ही फळे चांगली आकार घेत आहेत; परंतु थंडीमुळे या झाडांना पुन्हा पालवी किंवा मोहोर फुटू लागला आहे. त्याचा परिणाम पहिल्या फळांवर होताना दिसत असून काही ठिकाणी फळे गळून पडत आहेत. ज्या झाडांना फळधारणा झालेली नाही, त्या झाडांसाठी मात्र ही थंडी फायदेशीर आहे.
...................
पॉईंटर
अशी वाढली थंडी
तारीख*तापमान नोंद (अंश सेल्सिअस)
२२ डिसेंबर २२*१४
९ जानेवारी २३*१३.५
१० जानेवारी २३*१० (नीचांकी तापमान)
११ जानेवारी २३*१०.५
१२ जानेवारी २३*११.५
...............
कोट
सध्याच्या थंडीमुळे फळे धरलेल्या फांदीला पुन्हा मोहोर येऊ शकतो. त्यामुळे अन्नाचे वहन नवीन मोहोरांकडे होऊन जुन्या मोहोरला वाटाणा किंवा सुपारीच्या आकाराची फळे गळून पडतात. हापूस आंब्यामध्ये हे प्रमाण २० टक्के आढळते. त्यामुळे आंबा बागायतदारांनी जिब्रेलिक ॲसिड ५० पीपीएम २० लिटर पाण्यात एक ग्रॅम मिसळून फवारणी करावी. नवीन मोहोर येण्यामध्ये हे रसायन अडथळा निर्माण करते. यासंदर्भात बागायतदारांनी कृषी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
- डॉ. विजय दामोदर, आंबा संशोधन उपकेंद्र, रामेश्वर-देवगड
................
कोट
कमी तापमानाचा पिकांच्या वाढीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी भाजीपाला किवा फळपिकांना सायंकाळच्या वेळेत हलकेसे पाणी द्यावे. याशिवाय आंबा, काजू फळबागांचे तज्ज्ञांच्या सल्ल्याने व्यवस्थापन करावे. जिल्ह्यात १३ डिग्री अंश सेल्सिअसपेक्षा सलग तीन दिवस तापमान राहिल्यास आंबा, काजू फळपीक विमाधारकांना लाभ होईल.
- दत्तात्रय दिवेकर, जिल्हा कृषी अधीक्षक, सिंधुदुर्ग
................
कोट
माझी पाचशेहून अधिक हापूस आंबा कलमे आहेत. यातील साधारणपणे १० टक्क्यांपेक्षा अधिक झाडांवर आता फळे आहेत; परंतु अधिकच्या थंडीमुळे फळे असलेल्या फांदीतून मोहोर येताना दिसत असून काही प्रमाणात फळगळदेखील होत आहे. जानेवारीत आंब्याला मोहोर आल्यामुळे हंगामही लांबणार आहे.
- विजय नाईक, आंबा उत्पादक शेतकरी, वेतोरे, ता. वेंगुर्ले
---
कोट
जम्मू, काश्मीर, लडाख आणि हिमाचल प्रदेशात हिमवृष्टी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रात थंडीमध्ये वाढ झालेली दिसून येत आहे. जिल्ह्यात १० अंश सेल्सिअसपर्यंत तापमानाची नोंद झाली असून गेल्या चार वर्षांतील ही नीचांकी तापमानाची नोंद आहे.
- डॉ. यशवंत मुठाळ, तांत्रिक अधिकारी, ग्रामीण कृषी मौसम सेवा, मुळदे