
मालवण शहरात दोन अपघात
75563
मालवण ः बाजारपेठ मार्गावर मोटार व रिक्षा यांच्यात धडक बसून अपघात झाला.
मालवण शहरात दोन अपघात
वाहनांचे नुकसान; बाजारपेठ रोडवर वाहतूक कोंडी
मालवण, ता. १४ : शहरातील बाजारपेठेत आज सायंकाळी दोन ठिकाणी किरकोळ अपघाताच्या घटना घडल्या. यात भरड मार्गे बाजारपेठ येथून जाणाऱ्या एसटीने रस्त्यालगत उभ्या असलेल्या दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीचे नुकसान झाले. तर दुसऱ्या घटनेत सारस्वत बँक रोड येथे मोटार व रिक्षा या दोन गाड्यांमध्ये टक्कर होऊन रिक्षा व मोटारीचे नुकसान झाले.
बाजारपेठ मार्गे जाणाऱ्या एसटीने रस्त्यालगत उभ्या केलेल्या दुचाकीला धडक दिल्याने ती रस्त्यावर कोसळून तिचे नुकसान झाले. यावेळी दुचाकी मालक व काही तरुणांनी बस थांबवून चालकाकडे भरपाईची मागणी केली. वाहतूक पोलिस गुरुप्रसाद परब यांनी घटनास्थळी हस्तक्षेप करत दोघांशी चर्चा केली. या चर्चेअंती एसटी चालकाने भरपाई देण्याचे मान्य केल्याने प्रकरण तडजोडीने मिटवले. तर दुसऱ्या अपघातात हॉटेल सागर किनारा रोड येथून बाजारपेठ मुख्य रस्त्याकडे येणाऱ्या मार्गाने रत्नागिरी येथून आलेल्या पर्यटकांची मोटार व बाजारपेठमार्गे जाणाऱ्या रिक्षा या दोन वाहनांमध्ये धडक बसून अपघात झाला. यावेळी पर्यटक व रिक्षा चालक यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. या दोन्ही घटनांमुळे बाजारपेठ रोडवर काहीकाळ वाहतूक कोंडी झाली. वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत दोन्ही बाजूंशी चर्चा केली. याबाबत तोडगा निघत नसल्याने हे प्रकरण पोलिस ठाण्यात नेले.